सांगली जिल्ह्यातला 400 वर्षं जुना वटवृक्ष अजूनही वाचवता येईल का? तज्ज्ञांनी सांगितले 3 पर्याय

मंगळवार, 11 जून 2024 (21:11 IST)
सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेला 400 वर्षांचा वटवृक्ष पावसामुळे उन्मळून पडला. यानंतर पर्यावरणप्रेमींवर शोककळा पसरली आहे. हा वटवृक्ष वाचवता आला असता का, हा वटवृक्ष अजूनही वाचवता येऊ शकता का असे अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमींच्या मनात आहेत.
 
सांगली जिल्ह्यातील 400 वर्षे जुन्या वडाचं झाड कोसळल्यानंतर त्याचं संवर्धन कसं करता येईल, हे झाड कसं वाचवता येईल त्यासाठी कोणकोणते पर्याय वापरता येतील यासंदर्भात बीबीसीनं वृक्ष संवर्धक आणि वाघोबा हॅबिटॅट फाउंडेशनचे संजीव वलसान यांच्याशी संवाद साधला.
 
वलसान यांनी राज्यातील हजारो झाडांचे संवर्धन केले आहे.
 
वलसान यांनी काही पर्याय सुचवले आहेत. जर त्याप्रमाणे काम करण्यात आलं तर अजूनही या झाडाचं आयुष्य वाढू शकतं असं वलसान यांचं म्हणणं आहे.
 
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसानंतर हे झाड कोसळलं आहे. हे झाड वाचावं यासाठी राष्ट्रीय महामार्ग देखील वळवण्यात आला होता. या झाडाच्या पारंब्या जमिनीपर्यत पोहोचल्या होत्या.
 
500 मीटरच्या प्रचंड विस्तारामुळे हे झाड हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान होतं. मात्र त्याच बरोबर या झाडाला मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील होतं. दरवर्षी मिरजमार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हे झाड म्हणजे एक मायेची सावली होतं.
 
साहजिकच जेव्हा महामार्गाच्या निर्मितीसाठी हे झाड तोडण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन विभागानं घेतला तेव्हा त्या विरोधात आंदोलन उभं राहिलं होतं.
 
पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि वारकऱ्यांनी हे झाड तोडलं जाऊ नये यासाठी साद घातली होती. त्यामुळे महामार्ग वळवून हे झाड वाचवलं गेलं होतं.
 
या वटवृक्षाशी असलेल्या भावनिक नात्यांमुळे अनेक जणांनी असं वाटतं की झाड वाचवण्याच्या पर्यायांची चाचपणी करण्यात यावी.
 
झाड अजूनही वाचवता येईल का?
उन्मळून पडलेल्या झाडांचं काय होतं, ती किती सुरक्षित असतात, त्यांचं काय केलं जाऊ शकतं. वडाच्या झाडांच्या बाबतीत काय करता येतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी बीबीसीने वृक्ष संवर्धक आणि 'वाघोबा हॅबिटॅट फाउंडेशन'चे संजीव वलसान यांच्याशी विविध मुद्द्यांबाबत चर्चा केली.
 
त्यातून त्यांनी तीन मुख्य पर्याय सुचवले.
 
या चर्चेदरम्यान वडासारखं झाड पुन्हा उभं करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना संजीव वलसान म्हणाले की,
 
"मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा तोक्टे हे चक्रीवादळ आलं होतं तेव्हा देखील अनेक वडाची झाडं उन्मळून पडली होती. आता जे झाडं उन्मळून पडलं आहे त्याच्या आकाराएवढी जरी नसली मोठी झाडं शहराच्या विविध भागात पडली होती. खासकरून मुंबईच्या विविध भागात झाडं उन्मळून पडली होती. आता सांगलीत जे झाडं पडलं आहे ते मी पाहिलं नाही मात्र बहुतांश वेळा जेव्हा वडाचं झाड पडतं तेव्हा तुमच्याकडे दोनपेक्षा अधिक पर्याय असतात," असं वलसान सांगतात.
 
हे तीन पर्याय नेमके कसे काम करतील याबाबत वलसान यांनी सविस्तर सांगितले आहे.
 
1. मुळांना पुन्हा तग धरू द्या
संजीव वलसान सांगतात, "पहिला पर्याय म्हणजे तुम्ही त्या झाडाला पुन्हा उभे करा आणि त्याला आधार द्या. झाडाच्या मुळांना पुन्हा तग धरू द्या. हे होऊ शकतं कारण आता मान्सून आलेला आहे. कारण इतर ऋतूमध्ये पाणी तितक्या प्रमाणात उपलब्ध नसतं.
 
"त्याचबरोबर हा ऋतूबदलाचा काळ असल्यामुळे झाडाच्या मुळांना बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता देखील खूप अधिक आहे. मात्र तुम्ही त्यावर उपाय आणि औषधोपचार केले पाहिजेत. तुम्ही फक्त झाड पुन्हा उभं केलंत आणि सोडून दिलंत असं होऊ शकत नाही. झाड पुन्हा उभं करताना तुम्ही झाडाकडे लक्ष ठेवायला हवं आणि आवश्यक औषधोपचार केले पाहिजेत."
 
"तुम्ही झाडाचा काही भाग पुन्हा उभा करू शकता. कारण हे 500 मीटरपर्यत विस्तार असलेलं खूप प्रचंड झाड आहे. वडाच्या झाडाचा विस्तार 1 किमी परिसरातदेखील होऊ शकतो. पडलेल्या झाडाचा विस्तार हा बहुधा नोंदवण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या झाडाच्या विस्ताराच्या एक तृतियांश विस्ताराएवढा आहे."
 
"त्यामुळे झाडाचा काही भाग पुन्हा उभा केला जाऊ शकतो आणि त्याला आधार देता येईल. असं करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक पर्याय असा आहे की तुम्ही झाडांची सर्व मूळं बाहेर काढून पुन्हा त्यांचं रोपण करावं.
 
2. 'झाडाच्या भोवती ओल्या मातीचा आधार द्या'
झाड सरळ उभं करून झाडाच्या भोवती ओल्या मातीचा आधार देणे हा पण एक पर्याय असू शकतो असं वलसान सांगतात.
 
"हे झाडं पुन्हा सरळ उभं करा आणि त्यावर मातीची भर घाला म्हणजे झाडाच्या भोवती ओल्या मातीचा आधार तयार करा आणि मुळांना खाली जाऊ द्या. झाडाला चांगला टेकू द्या आणि झाडाची मुळं हळूहळू जमिनीत खाली जाण्याची वाट पाहा," असं संजीव वलसान म्हणाले.
 
संजीव वलसान पुढे म्हणाले, "मी जरी ते झाड पाहिलेलं नसलं तरी मला असं वाटतं की सर्वांत शेवटचा आणि वाईट पर्याय म्हणजे झाडाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावणं. मात्र जर झाडाची काही मुळं तग धरून असतील तर तुम्ही ते झाड तिथे तसंच पडू देऊ शकता आणि जी मुळं उघडी पडली आहेत त्यावर जितकी शक्य आहे तितकी माती तुम्ही टाकू शकता. त्या मुळांना मातीनं झाकू शकता."
 
"शेजारी जर खड्डा खणता आला तर त्यात झाडाच्या उरलेल्या भागाचं पुन्हा रोपण करू शकता," असं वलसान यांना वाटतं.
 
3. 'झाड आहे तसं राहू द्या'
शेवटचा पर्याय हा तसा कठोर वाटू शकतो पण तो वैज्ञानिक असल्याचे वलसान सांगतात. त्यातूनही हे झाड जिवंत राहू शकतं असं ते सांगतात.
 
"तिसरा पर्याय म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य लोकांना त्यासंदर्भातील माहितीच्या अभावामुळे बहुतांशकरून ते आवडत नाही. काही वेळा तुम्ही ते झाड तसंच तिथं पडू द्या आणि झाडाची मूळं पुन्हा आपोआप रुजतील.
"त्यामागचं कारण असं आहे की जेव्हा एखादं झाडं कोसळतं तेव्हा त्याची सर्व मूळं तुटत नाहीत. काही वेळा ती 40 टक्के असू शकतात, काही वेळा 50 टक्के आणि काही वेळा अगदी 90 किंवा 95 टक्के झाडाची मूळं तुटलेली असू शकतात. मात्र झाडाची काही मूळं जमिनीत तग धरून असतात." असं संजीव वलसान यांनी सांगितलं.
 
"जंगलात जिथं झाडांची निगा घ्यायला कोणी नसतं किंवा जिथं उन्मळून पडलेली झाडं उचलून न्यायला कोणी नसतं तिथं तुम्हाला दिसून येईल की झाडं उन्मळून पडतात आणि नंतर त्यांची मुळं पुन्हा तग धरतात आणि झाडं पुन्हा उभी राहतात किंवा त्यांची वाढ होते. किंबहुना त्यानंतर झाडांची अधिक वाढ होते." असं संजीव वलसान म्हणाले.
 
"वडाच्या झाडांमध्ये झाडाला पारंब्या असतात. झाड 45 अंशामध्ये कोसळलेलं असल्यास त्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचतात आणि त्यापासून झाडाचं खोड तयार होतं. अगदी झाड पूर्णपणे उन्मळून पडलेलं असलं आणि जमिनीत झाडाची काही मुळं तग धरून असल्यास असं होऊ शकतं की झाडाच्या संपूर्ण लांबीतून किंवा खोडातून झाडाच्या नवीन शाखा बाहेर पडण्यास सुरूवात होऊ शकते आणि त्यातून एक नवीन झाड उभं राहू शकतं," असं वलसान यांना वाटतं.
 
'उन्मळून पडलेलं झाड हे मृत नसतं'
वलसान सांगतात की झाड हे उन्मळून पडलं तरी ते मृत झालं असं अजिबात नसतं.
 
वलसान सांगतात, "मात्र यातील वास्तव हे आहे की उन्मळून पडलेलं वडाचं झाड हे काही मृत झाड नसतं. बहुतांश परिस्थितीत उन्मळून पडलेली वडाची झाडं मृत झालेली नसतात. म्हणजेच झाड पडलं आहे म्हणजे ते मेलं आहे आणि सगळं संपलं आहे असं अजिबात नाही."
 
"मात्र यातील महत्त्वाचा भाग असा ही हे कोण करणार. कारण हे सर्व पटकन करायला हवं. कारण झाडाची मुळं जितका अधिक काळ हवेत उघडी पडतील तितकंच त्यांना बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका वाढेल." असं संजीव वलसान म्हणाले.
 
"त्यामुळे कोणीही तरी झाड जिथं उन्मळून पडलं आहे तिथं जाऊन झाडाची जी मुळं उघडी पडली आहेत त्यावर बुरशीनाशक फवारलं पाहिजे. त्यानंतर मग झाडं पुन्हा उभं करण्याची योजना आखली गेली पाहिजे. त्यासाठी निधी उभारला गेला पाहिजे," असं वलसान सुचवतात.
वडाच्या झाडाच्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे झाड वाचवणे सोपे असल्याचे वलसान यांना वाटते.
 
ते सांगतात, "वडाच्या झाडाच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याला पारंब्या असतात आणि ती हवेत असणारी एक प्रकारची मुळंच असतात. वडाच्या झाडाची रचना अशी असते की त्यात झाडाची मुळं झाडाच्या वर असतात. संपूर्ण फांदीवर मुळं म्हणजे पारंब्या असतात.
 
"त्यामुळे वडाच्या झाडाच्या पारंब्या किंवा फांद्यापासून त्याचं पुन्हा रोपण करणं सोपं असतं आणि ती वेगानं होतं. वड, उंबर ही फायगस फॅमिलीतील झाडं आहेत. या फॅमिलीतील झाडांच्या तुटलेल्या भागातून पुन्हा नवीन झाडं उभं करणं सोपं असतं," असं वलसान सांगतात.
 
'स्मृती रूपाने वृक्षाचे जतन करू'
सांगलीतील वडाचं महाकाय झाड कोसळण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना पर्यावरणप्रेमी प्रवीण शिंदे म्हणाले,
 
"भोसे येथील 400 वर्षे जुना वटवृक्ष 4 वर्षापूर्वी रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी तोडला जाणार होता. त्यावेळेस या वृक्षाचं जतन करण्यासाठी आम्ही एक आंदोलन उभं केलं होतं. त्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्ष वाचवला होता. त्यानंतर आता मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये हा वटवृक्ष उन्मळून पडला आहे.
 
आता आम्ही सर्व पर्यावरणप्रेमींनी याबाबत निर्णय घेतला आहे आणि जिल्हा प्रशासनानं यासंदर्भात पाऊल उचललं आहे की या झाडाच्या खोडाचं आम्ही संरक्षण करणार आहोत. या झाडाच्या खोडाचं जिवंत स्मारक करण्यात येईल आणि या झाडाच्या फांद्यांचं जिल्ह्यातील 700 गावांमध्ये रोपण केलं जाणार आहे. त्यामुळे या झाडाचं जनुक जिल्हाभर टिकवलं जाणार आहे. हा वृक्ष आम्ही स्मृती रुपानं जपणार आहोत."
 
जिल्हा प्रशासन काय करणार आहे ?
दरम्यान, या झाडाच्या फांद्यांचे रोप तयार करुन ते वाटले जाणार असल्याचे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ति धोंडमिसे यांनी सांगितले आहे.
 
धोंडमिसे म्हणाल्या "आता या झाडाच्या ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 700 गावात, फांद्या तोडून त्याचे रोप तयार करून प्रत्येक गावात लावले जाणार आहेत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा निर्णय घेतलाय."
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती