पुणे महापालिकेचा एक मोठा निर्णय, खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव

मंगळवार, 30 मार्च 2021 (08:20 IST)
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं एक मोठा निर्णय घेतलाय. खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
 
“खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील”, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.
 
पुणे शहरात साधारणपणे 5 हजार 8 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील सध्या केवळ 490 बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या बेड्सची संख्या 243, ऑक्सिजन बेड 217, आयसीयू बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड 10 आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण 2 हजार 682 बेड कमी पडत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती