Chaitra Gauri Haldi Kumku : चैत्र गौरीचे हळदीकुंकू

बुधवार, 30 मार्च 2022 (23:08 IST)
चैत्रागौर व हळदीकुंकू : चैत्र. शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, नानाप्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून आरास करतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. 
 
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र शु. तृतीयेला गौरी तृतिया साजरी होते. या दिवशी गौरीची पूजा करून तिला लाकडी किंवा पितळी हिंदोळ्यावर बसविली जाते व नंतर तिला गाणी म्हणत झोके देतात. काही ठिकाणी या पुजेस दोलोत्सव असेही म्हणतात आणि तो अक्षय तृतीयेपर्यंत चालू असतो. या दिवशी स्त्रिया सुवासिनींना – हळदी – कुंकू देऊन त्यांची ओटी भरतात व त्यांना हरभऱ्याची वाटली डाळ आणि पन्हे देतोत. ज्यांच्या घरी दोलोत्सव नसतो त्या स्त्रिया महिन्याभराच्या काळात एक दिवस केवळ सुवासिनींना हळदीकुंकू देतात.  
 
या हळदीकुंकूवामुळे परिचित स्त्रियांना, मैत्रिणींना आणि आप्तेष्ट स्त्रियांना भेटण्याची, त्यांच्याशी सुखसंवाद साधण्याची चांगली संधी गृहिणींना मिळते. चित्ताला प्रसन्नता आल्यामुळे नित्याच्या एकसुरी जीवनात त्यामुळे चांगला बदल घडून येतो.
 
हळदी कुंकू या प्रथेला एक विशिष्ट अर्थ आहे. जी गोष्ट आपण दान करतो ती आपल्याला भरभरून मिळते अशी समजूत यामागे आहे. पूर्वी स्त्रियांचे जीवन सौभाग्याशी (पतीशी) जास्त निगडित होते. तिच्या सवाष्णपणाला समाजात मान होता. हे सौभाग्य वृद्धिंगत व्हावे म्हणून प्रत्येक घरी हळदी कुंकू लावून हाताला चंदनउटी व त्यावर नक्षी रेखली जाते. त्यांना प्रसाद म्हणून फक्तत याच दिवसात केली जाणारी कैरीची डाळ तसेच पन्हे दिले जाते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये मिळणार्‍या कलिंगडाच्या फोडीसुद्धा वाटल्या जातात. प्रसाद म्हणून खिरापत, बत्तासे देतात. हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक सवाष्णींची भिजवलेल्या हरभर्‍याने ओटी भरली जाते. तसेच जाताना दिला सोनचाफा, मोगरा अशासारखी सुगंधी फुले दिली जातात. 
 
कोंकणात हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनिचे व कुमारिकांचे पाय धुऊन त्यांच्या हातांवर चंदानाचे लेप करतात आणि त्यावरून शिरा असलेली शिंप फिरवितात. भिजवलेल्या हरबर्‍यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. गौरीची आरती करताना 'गौरीचे माहेर' नावाचे गाणे म्हणण्याची कोंकणात चाला आहे. या महिन्यांत गौरी आपल्या माहेरी येते, आपल्या आईकडून सर्वप्रकारची कौतुके करून घेते, मैत्रिणीबरोबर खेळते, झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती