सेंगोल म्हणजे नेमकं काय? तो पुन्हा चर्चेत यायचं कारण काय?

शुक्रवार, 28 जून 2024 (10:07 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. त्यानंतर नव्या संसद भवनात सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर सेंगोल ठेवण्यात आला.आता हा सेंगोल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी यांनी बुधवारी (26 जून) म्हटलं की, "सेंगोल' म्हणजे 'राज-दंड' किंवा राजाची काठी असा होता. पण आता देश स्वतंत्र झाला आहे, मग तो राजाच्या काठीनं चालवला जाणार की संविधानानं? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल काढण्यात यावा, अशी माझी मागणी आहे."
 
दरम्यान, गेल्या वर्षी सेंगोलची प्रतिष्ठापना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली होती.
 
अमित शाह यांनी सांगितलं होतं की, "संसद भवनच्या उद्घाटनाच्या दिवशी एक नवीन परंपरा सुरू होणार असल्याची माहिती दिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 ला तामिळ पुजाऱ्यांच्या हस्ते सेंगोल स्वीकार केला होता.
 
"भारतीय सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून हा सेंगोल पाहिला गेला. त्यानंतर नेहरूंनी तो एका संग्रहालयात ठेवला आणि तेव्हापासून तो तिथेच आहे."
सेंगोलबाबत भाजपचा दावा बोगस - काँग्रेस
त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप सरकारचा सेंगोल विषयीचा दावा खोडून काढला होता.
 
त्यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, सी राजगोपालाचारी किंवा जवाहरलाल नेहरू यांना ब्रिटीशांकडून भारतीय सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांनी सेंगोल दिल्याचं कुठेही म्हटलेलं नाही.
 
त्यांनी आरोप करताना म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक तामिळनाडूमध्ये स्वतःचं हित साधून घेण्यासाठी सेंगोलचा वापर करत आहेत.
नेहरूंना हा सेंगोल भेट म्हणून मिळाला होता, नंतर तो अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आल्याचं जयराम रमेश यांनी सांगितलं. ते पुढे लिहितात की, ‘त्यांनी नेहरूंवर भले कितीही लेबल लावू दे पण 14 डिसेंबर 1947 रोजी नेहरू जे काही बोलले होते त्याची लिखित नोंद आहे.’
सेंगोल आणि चोल साम्राज्य
भारतीय उपखंडात चोला हे सर्वांत जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्यांपैकी एक होते. तीन तामिलकम राजांपैकी मुकुटधारी एक, आणि सोबत चेरा आणि पंड्या अशा साम्राज्याची 13 व्या शतकापर्यंत विविध प्रांतावर सत्ता होती.
 
एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्तेचं हस्तांतर सेंगोल देऊन पूर्ण होत असे. हेच शक्तिशाली प्रतीक ऑगस्ट 1947 साली भारताचं स्वातंत्र्य मिळवताना स्वीकारण्यात आलं.
 
अमित शाह यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की सेंगोल तामिळ भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ ऐतिहासिक आणि संपन्न आहे.त्यांच्या मते सेंगोलचा चोल साम्राज्याशी संबंध आहे आणि त्यावर एक नंदीसुद्धा आहे.
 
अमित शाह यांनी दावा केला की इंग्रज भारतातील सत्तेचं हस्तांतरण कसं करणार त्याची काय प्रक्रिया असेल, यावर चर्चा होत होती.
त्यानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांना या परंपरेची माहिती नव्हती. तर त्यांनी नेहरूंशी सल्लामसलत केली. मात्र नेहरू गोंधळात पडले होते. मग त्यांनी राजगोपालाचारी यांच्याशी चर्चा केली.
 
अमित शाह पुढे म्हणाले, “राजगोपालाचारी यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांनी सेंगोलच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली, आमच्याकडे सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक आहे. भारताकडे शासन एका अध्यात्मिक परंपरेतून आलं आहे.
 
"सेंगोल शब्दाचा अर्थ भाव आणि नीतीचं पालन असा आहे. ते पवित्र आहे आणि त्यावर नंदीबैल विराजमान आहे. ही प्रथा आठव्या शतकापासून सुरू झाली आहे आणि चोल साम्राज्याकडून चालत आली आहे.”

Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती