राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील बटवालन मोहल्ला येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल चौथीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी शाळेत निषेध केला, त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी दुपारी घडली, जेव्हा चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यर्थ्याला त्याच्या शिक्षिका यांनी गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल काठीने मारहाण केली. मारहाण इतकी जोरदार होती की मुलाच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. असे असूनही, त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी, शिक्षिकेने त्याला फक्त मलमपट्टी केली आणि त्याच्या भावासह घरी पाठवले. कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शाळेत पोहोचून गोंधळ घातला. काही वेळातच, मोठ्या संख्येने गावकरी शाळेत जमले आणि त्यांनी शिक्षिकेवर कारवाईची मागणी करण्यास सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शिक्षिका यांना पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.