मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या 'रायसीना डायलॉग 'चे उद्घाटन करतील. भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्र या विषयावरील ही भारतातील प्रमुख परिषद आहे. या परिषदेत १२५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. ही परिषद १७ ते १९ मार्च दरम्यान आयोजित केली जाईल. परिषदेच्या १० व्या आवृत्तीत न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई त्सिबिहा हे देखील सहभागी आहे. मिळालेल्या माहितनुसार, पहिल्यांदाच तैवानमधील एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यासह एक शिष्टमंडळ या परिषदेत उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. हे गेल्या काही वर्षांत दोन्ही बाजूंमधील वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे.
ही परिषद परराष्ट्र मंत्रालयाच्या भागीदारीत थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आयोजित करत आहे. या परिषदेत सुमारे १२५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले. त्यात मंत्री, माजी राष्ट्रप्रमुख, लष्करी कमांडर, आघाडीचे उद्योगपती, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धोरणात्मक बाबींचे अभ्यासक आणि आघाडीच्या थिंक टँकमधील तज्ज्ञांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० देशांचे परराष्ट्र मंत्री या चर्चेत सहभागी होतील.