मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा; उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होणार?

बुधवार, 6 जुलै 2022 (20:12 IST)
केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदतही संपत आली आहे. डीडी न्यूजने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
उपराष्ट्रपतिपदासाठी मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा आहे. नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गुरुवारी संपतो आहे. 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकांसाठीच्या भाजपच्या यादीत नक्वी यांचं नाव नव्हतं.
 
मुख्तार अब्बास नक्वी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते.
 
नक्वी 2010 ते 2016 कालावधीत उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्य होते. त्यानंतर झारखंडमधून ते राज्यसभा सदस्य होते.
 
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं. दोन वर्षांनंतर त्यांना स्वतंत्र मंत्रालय देण्यात आलं.
 
2019 मध्ये मोदी सरकारची पुनर्स्थापना झाल्यानंतर नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला.
 
राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी
येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 29 जूनपर्यंत नामांकन अर्ज भरावा लागणार आहे. 18 जुलै रोजी मतदान पार पडेल आणि 21 जुलै रोजी निकाल घोषित केले जातील.
 
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून द्रौपदी मुर्मू यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.
 
राष्ट्रपतीपदासाठी मागील निवडणुकीत भाजपने बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती. तर यावेळी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
 
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्या त्यांचं मूळ राज्य असलेल्या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मध्ये वास्तव्यास आहेत. रायरंगपूर हे त्यांच मूळ गाव बैदापोसीचं ब्लॉक मुख्यालय आहे. त्या सहा वर्षांपेक्षा जास्त काळ झारखंडच्या राज्यपाल होत्या.
 
द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती होऊ शकतात. त्या एनडीएच्या उमेदवार आहेत आणि मतांचा विचार करता एनडीए सध्या विजयाच्या जवळ आहे.
 
या पदासाठी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देऊ केली आहे. यशवंत सिन्हा हे भारतीय प्रशासकीय (आयएएस) सेवेत कार्यरत होते. त्याचप्रमाणे ते झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघातून भाजपचे लोकसभा खासदार होते. त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवलं आहे.
 
ते प्रदीर्घ काळ भाजपचे वरिष्ठ नेते होते. पण अलीकडच्या काळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलू लागल्यावर मात्र त्यांना पक्ष सोडावा लागला.
 
भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून 1979 मध्ये द्रौपदी मुर्मू बीए उत्तीर्ण झाल्या. पुढे त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षक म्हणून ही काम केलं.
 
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षक म्हणून काम केलं. आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत त्यांनी एक मेहनती कर्मचारी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती