मध्य प्रदेशच्या शिवराज सिंग चौहान सरकारने एक नवा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. शिवराज सरकारमधील शिक्षण मंत्री विजय शाह यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सतना येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे.
सतना जिल्ह्यात हा प्रय़ोग यशस्वी झाला तर शिवराज सिंग चौहान यांच्या परवानगीने राज्यभरात हा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांवर हा आदेश लागू करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही असं विजय शाह म्हणाले. पण जय हिंदचा संबंध देशभक्तीसोबत असल्याने त्या शाळादेखील हा आदेश लागू करतील अशी अपेक्षा यावेळी विजय शाह यांनी व्यक्त केली.