सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी

सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (12:05 IST)
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वचननामा जाहीर केला आहे. त्यात मध्यप्रदेशात सत्ता आल्यास सरकारी इमारत आणि परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वचननाम्यातून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कारही केला आहे.
 
काँग्रेसच्या या वचननाम्यात प्रभू राम, नर्मदा, गोवंश आणि गोमूत्राचा उल्लेख करून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी इमारती आणि परिसरात संघाला शाखा उभारण्यास मनाई केली जाईल. तसेच सरकारी कर्मचार्‍यांना संघाच्या शाखेत भाग घेण्याची परवानगी देणारा सरकारी अध्यादेश रद्द करण्यात येईल, असे आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आले आहे. संघ देशवासियांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. काँग्रेसने या वचननाम्यातून राहुल यांच्या या आरोपांना एकप्रकारे बळकटी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सत्तेत आल्यावर चित्रकूटमधून सुरू होणार्‍या रामपथ गनचीही निर्मिती  करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय नर्मदा नदीच्या संरक्षणासाठी माँ नर्मदा न्यास अधिनियम तयार करण्यात येईल. तसेच नर्मदा परिसरात 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहे बांधण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्याशिवाय रोजगार, शेतकरी आणि  सामाजिक सुरक्षेवरही या वचननाम्यात जोर देण्यात आला आहे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशात निवडणुका होत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती