दिवाळखोरीसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी, कर सुसूत्रीकरण आणि इतर सुधारणांमुळे भारताने 23 गुणांची झेप घेत 77 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. गेल्या वर्षी या क्रमवारील भारत 100 व्या स्थानी होता. भारताची कामगिरी 10 पैकी सहा मानकांमध्ये सुधारल्याचे जागतिक बॅंकेच्या "इज ऑफ डुइंग बिझनेस 2019' या अहवालात म्हटले आहे. या मानकांमध्ये नवा उद्योग सुरू करणे, बांधकाम परवाने, वीजजोडणी, पतपुरवठा, करभरणा, सीमेपलीकडील व्यापार आणि दिवाळखोरीच्या प्रकरणांचा निपटारा आदींचा समावेश आहे.
केंद्रात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तेव्हा भारत "इज ऑफ डुइंग बिझनेस'मध्ये 142 व्या स्थानावर होता. "इज ऑफ डुइंग बिझनेस 2019'च्या यादीत 190 देशांमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानी असून, त्याखालोखाल सिंगापूर, डेन्मार्क आणि हॉंगकॉंग यांचा समावेश आहे.