हृदयाचे जादूगार हिंदुस्तानातील अन्जिओप्लास्टीचे जनक प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युअल कालरिकल यांचे वयाच्या 77 व्या वर्षी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या निधनाने हृदयाचा जादूगार हरपला अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. मॅथ्यू यांनी अनेक राजकीय नेते व उद्योगपतींवर उपचार केले. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजियोप्लास्टी केली. तसेच शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हृदयविषयक तक्रारी जाणवल्यावर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले.
डॉ. मॅथ्यू यांनी 1986 मध्ये भारतात पहिली यशस्वी अँजिओप्लास्टी केली. त्यांचे आशिया आणि पेसिफिक क्षेत्रासह अनेक देशात अन्जिओप्लास्टीची सुविधा उभारण्यात विशेष योगदान आहे.
त्यांनी अनेकांना जीवनदान दिले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांना 1996 मध्ये डॉ.बी.सी. रॉय पुरस्काराने सन्मानित केले तर 2003 मध्ये त्यांना तामिळनाडू येथील डॉ. एम.जी.आर वैद्यकीय विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ऑफ सायन्सच्या पदवीने सन्मानित केले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.