देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र: सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’

सोमवार, 25 जानेवारी 2021 (15:44 IST)
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येत आहे. विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेने सुरु केलेले देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे. २६ जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
 
मएसो सुबोधवाणी मुळे प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलतेची जोड देत विद्यार्यशी संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओ तंत्रज्ञानामुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार असून एकाच वेळी दहा हजार श्रोते त्याचे कार्यक्रम इंटरनेटद्वारे ऐकू शकतील. त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे.
 
या उपक्रमाविषयी बोलताना इंजि. सुधीर गाडे म्हणाले, “संस्थेच्या गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे आगळ्यावेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी एक तास प्रसारण करण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या या केंद्राचे प्रायोगिक सादरीकरण सुरू आहे.
 
विज्ञान भारती संस्थेचे विलास रबडे यांनी सांगितले की, इ. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम मएसो सुबोधवाणी केंद्रावर सादर केले जातील. सर्जनशील व कल्पक विचारांना प्रवृत्त करणारा कंटेंट हे मएसो सुबोधवाणी’चे वैशिष्ट्य असेल, शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती