चंद्रयान-3 : लँडिंगदरम्यान 18 व्या मिनिटाला आला होता मोठा अडथळा, शास्त्रज्ञही थरथर कापत होते
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (13:11 IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ची चंद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली आहे. इस्रोने पाठवलेलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरलं आहे. या निमित्ताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये चंद्रयान-2 या मोहिमेला अपयश आलं होतं. पण हे अपयश धुवून काढत त्यातून धडे घेऊन शास्त्रज्ञांनी चंद्रयान-3 यशस्वी करून दाखवलं.
त्यामुळे, भारतासाठी हा प्रसंग नक्कीच ऐतिहासिक असून जगभरातून या यशाबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यात येत आहे.
पण, चंद्रयान-3 मोहिमेत विक्रम लँडर चंद्रापासून 150 मीटर अंतरावर असताना हे काम पाहत असलेल्या शास्त्रज्ञांचा श्वास रोखला गेला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
होय. लँडिंगदरम्यानचे ते 30 सेकंद अतिशय महत्त्वाचे होते. या टप्प्यावर प्रत्येक मोहिमेत काम करत असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाचा काळजाचा ठोका चुकला होता. पण या कालावधीत असं काय घडलं होतं? चला जाणून घेऊ.
नेमकं काय घडलं?
ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन याबाबत बोलताना म्हणाले, “विक्रम लँडर चंद्रापासून 800 मीटरवर पोहोचेपर्यंत त्याचं काम अगदी योग्यरित्या सुरू होतं. ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणेच सुरू होती. पण लँडर 150 मीटरवर पोहोचल्यानंतर त्याला एक अडथळा आला होता.”
“पण हा अडथळा आढळून येताच लँडरने आपला मार्ग बदलला. त्याने लँडिंगसाठी दुसरं सुरक्षित ठिकाण निवडलं,” असंही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “विक्रमचं लँडिंग लाईव्ह पाहत असलेल्यांना ही गोष्ट समजली नाही. कारण ते इथून पाहायला अगदी सोपं वाटत होतं. पण शास्त्रज्ञांचा श्वास मात्र 30 सेकंदांसाठी रोखला गेला होता.”
वेंकटेश्वरन पुढे म्हणतात, “विक्रम लँड होणारच होतं, पण तितक्यात हा अडथळा आल्यामुळे आम्ही काळजीत पडलो होतो. लँडिंगची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी चार मिनिटे आधी लँडरला ऑटिमेटिक लँडिंगचा संदेश देण्यात आला होता. त्यामुळे ही प्रक्रिया 15 मिनिटांऐवजी 19 मिनिटांची झाली. 18 मिनिटे प्रक्रिया व्यवस्थित सुरू होती. पण 18 व्या मिनिटाला आलेल्या या समस्येने चिंता वाढल्या होत्या. पण लँडरने या समस्येतून मार्ग काढताच प्रत्येकाने सुटकेचा निःश्वास सोडला.”
“लँडिग करत असताना हा अडथळा आल्यानंतर यानाचा वेग बदलला. त्यानंतर ते अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. या सगळ्या गोष्टी पाहता यानात लावण्यात आलेले सेन्सर, समस्या प्रतिरोधक यंत्रणा आणि सिग्नलिंग आदी उपकरणे अतिशय योग्य प्रकारे काम करत आहेत, हे कळून येतं.”
आता पुढे काय?
चंद्रावर लँडिंग केल्यानंतर आता विक्रम लँडरची स्थिती कशी आहे, हासुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. याबाबत तपशील जाणून घेण्यासाठी यान पाठवत असलेल्या माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष लावण्यात येतील.
आता यापुढे विक्रम लँडरमधून एक रोव्हर बाहेर पडले आहे. यासंदर्भात बोलताना टी.व्ही वेंकटेश्वरन म्हणाले, “आता यावर सोलार पॅनेल बसवले जाण्याची प्रक्रिया आधी पूर्ण केली जाईल. लँडरचा दरवाजा उघडताच दोन तासांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर रोव्हर बाहेर येईल.”
“रोव्हर बाहेर आल्यानंतर ते सौरऊर्जेवरच चार्ज होईल. पुढे जाऊन ते काही फोटो काढेल. या फोटोंची संपूर्ण जग प्रतीक्षा करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पडल्यास ही मोहीम 100 टक्के यशस्वी झाली असं म्हणता येईल.”
सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञ डॉ. एस. पांडियन याबाबत बोलताना म्हणाले, “ही मोहीम आतापर्यंत 95 टक्के यशस्वी ठरली आहे.
ISRO चं यश
चंद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने इस्रोला खूप मोठं यश मिळालं आहे. या ऐतिहासिक घटनेला अंतराळ क्षेत्रात एक माईलस्टोन म्हणून पाहिलं जाईल.
या निमित्ताने भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश आहे.
ही मोहीम यशस्वी होताच इस्रोने त्याची घोषणा केली. ट्विटरवर ते म्हणाले, “चंद्रयान-3, मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो आणि तुम्हीही.”
चंद्रयान मोहिमेची सुरूवात पंधरा वर्षांपूर्वी झाली होती. 2008 साली भारताने चंद्रयान-1 प्रक्षेपित केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये चंद्रयान-2 मोहीम राबवण्यात आली होती. या दोन्ही मोहिमांमधून धडे घेत भारताने चंद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.