चंद्रयान-3 नंतर चंद्रयान-4 मधून इस्रो अंतराळवीर पाठवू शकेल का?
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (14:17 IST)
चंद्र असो वा मंगळ...कोणत्याही अशा ग्रह-उपग्रहावर कृत्रिम उपग्रह पाठवण्याच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचं आव्हान असतं ते त्यांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणं.
हे आव्हान इतकं मोठं असतं की सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि रशियाच्या चंद्रावर यान पाठवण्याच्या 14 मोहिमा अपयशी ठरल्या होत्या आणि त्यांना 15 व्या वेळेस यश आलं होतं.
हे पाहाता भारताचं चंद्रयान 1 फारच यशस्वी ठरलं. इस्रोने पहिल्याच प्रयत्नात हा मोठा अडथळा पार केला होता.
आता इस्रोचं चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं आजवर कोणताही कृत्रिम उपग्रह पोहोचलेला नाही.
पहिल्याच प्रयत्नात इस्रोला मिळालेलं यश
नासाने दिलेल्या माहितीनुसार अपोलो-11 मोहिमेद्वारे चंद्रावर पहिल्यांदा मानवी पाऊल पडलं. त्याआधीसुद्धा अमेरिकेने अंतराळविरांना या मोहिमेसाठी पाठवलं होतं.
25 डिसेंबर 1968 रोजी फ्रँक बोरमन, बिल अंड्रेस, जिम लोवेल यांना घेऊन अपोलो 10 यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि ते परत आलं होतं. ते चंद्रावर उतरले नाहीत त्यामुळे त्याची माहिती जगाला मिळाली नाही.
अपोलो-11 मधून नील आर्मस्ट्राँग, मायकल कॉलिन्स आणि बझ ऑल्ड्रिन गेले होते. 21 जुलै 1969 रोजी नील यांनी चंद्राच्या पृष्ठावर पाय ठेवला. काही वेळाने बझ ऑल्ड्रिनही तिथं गेले. या काळात मायकल कॉलिन्स यांनी चंद्राच्या कक्षेत यान फिरत ठेवलं.
14 नोव्हेंबर 1969 रोजी अपोलो 12 ने आणखी तीन अंतराळवीर चंद्रावर पाठवले, त्यानंतर अपोलो 17 ने 7 डिसेंबर 1972 रोजी आणखी 3 अंतराळवीर चंद्रावर पाठवले.
त्यानंतर चंद्रावर माणसाला पाठवण्याचे प्रयोग नासाने बंद केले.
अर्थात या यशाबरोबर अनेकवेळा अपयशाचाही त्यांना सामना करावा लागला.
21 फेब्रुवारी 1967 रोजी नासाचं अपोलो 1 प्रक्षेपणासाठी तयार होतं. मात्र प्रात्यक्षिक परिक्षणाच्यावेळेसच केबिनला आग लागली आणि रॉकेटचा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत 2 अंतराळवीर आणि चालकदलाच्या 27 जणांचा मृत्यू झाला होता.
असा इतिहास असतानाच दुसरीकडे इस्रोच्या कमीत कमी भांडवलात सुरू असलेल्या मोहिमांना सुरुवातीच्या प्रयत्नांतच चांगलं यश मिळालेलं आहे.
चंद्रयान-3 नंतर काय होईल?
चंद्रयानाचा उपयोग इस्रो फक्त चंद्रावर रोव्हर आणि लँडर पाठवण्यासाठी करत नाहीये. इतर मोहिमांप्रमाणे या मोहिमेचंही ध्येय चंद्रावर मनुष्याला उतरवणं हेच आहे. मात्र ते साध्य करणं इतकं सोपं नाही.
ते साध्य करण्याची ताकद सध्याच्या इस्रो रॉकेट आणि इंजिनमध्ये नाही. त्यासाठीच इस्रो एकेक टप्प्यावर यश मिळवत हळूहळू पुढं जात आहे.
चंद्रयान-1 मध्ये ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब लाँच केलं गेलं. त्यानंतर चंद्रयान 2मध्ये ऑर्बिटरबरोबर लँडर आणि रोव्हर पाठवले गेले आणि चंद्रयान 3मधून फक्त लँडर आणि रोव्हर पाठवले आहेत या प्रयोगात चंद्रयान 2द्वारे पाठवलेल्या ऑर्बिटरचा वापर केला जात आहे.
चंद्रयान 3 चे श आणि त्याने गोळा केलेल्या माहितीवर चंद्रयान 4नंतरचे प्रयोग सुरू राहातील. जर ते सुद्धा यशस्वी झाले तर पुढच्या मोहिमांत मनुष्यासह यान पाठवण्याचे प्रयत्न केले जातील.
या दिशेने काही दुसरेही प्रयोगही सुरू आहेत. इस्रोचं पुढचं गगनयान याच प्रयत्नांपैकी एक आहे.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा रशिय़ाच्या सोयूझ टी-11 अंतराळ यानातून 1984 साली अंतराळात गेले आणि जवळपास 8 दिवस ते अंतराळात राहिले.
आता भारत इतर देशांच्या मदतीविना स्वदेशी तंत्राद्वारे मनुष्याला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.
गगनयान प्रयोगात अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी उंचावर नेऊन तिथं 3 दिवस राहून पुन्हा आणण्याची संकल्पना आहे.
अंतराळवीर परतण्याचं आव्हान
चंद्रयानाच्या आजवरच्या प्रयोगात वापरले गेलेले ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर पृथ्वीवर परत आणले गेले नाहीत. मात्र अंतराळवीरांना पाठवल्यावर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणं हे आव्हान असेल.
त्यासाठी नासाच्या मॉडेलनुसार क्रू मोड्युल तयार करण्याची गरज आहे. तसंच कमीतकमी वेळात चंद्रावर जाण्यासाठी मोठी रॉकेट्स तयार करावी लागतील.
चंद्रावर उतरण्यासाठी मनुष्यासह लँडर पाठवायचे असेल आणि लँडरला पृथ्वीवर परत यायचे असेल तर चंद्रापासून काही उंचीवर एक कमांड मोड्यूलही लागेल.
या कमांड मोड्यूलमधून लँडर चंद्रावर उतरेल आणि अंतराळवीर तिथं संशोधन करुन पुन्हा लँडर मोड्यूलमधून चंद्राच्या पृष्ठावर कमांड मोड्यूलमध्ये परततील.
हे सर्व प्रयोग 10 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचं आव्हानही आहे. त्यासाठी उच्च तंत्रज्ञान आणि मोठ्या रॉकेटची गरज आहे. चंद्रावर वायूमंडल नाही. अंतराळातील तापमानही अत्यंत कमी होतं. त्य़ामुळे तिथं रॉकेट जाण्यासाठी क्रायोजेनिक इंजिन तयार करावं लागणार.
या सर्वांशिवाय प्रक्षेपणकाळातील त्रूटी दूर करण्यासाठी आणि अंतराळवीरांच्या क्रू मोड्युलच्या संरक्षणासाठी क्रू एस्केप सिस्टिमही तयार करावी लागते. त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठीही क्रू मोड्यूल तयार करावं लागेल.
हे सर्व करणं चंद्रयान 3 आणि त्याच्या यशावर अवलंबून आहे. जर चंद्रयान 3 यशस्वी झालं आणि यानंतरचे प्रयोगही योजनाबद्ध पातळीवर यशस्वी झाले तर इस्रो चंद्रयान 10 किंवा 11 मध्य़े चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी सक्षम होईल.
इस्रोला मोठ्या रॉकेटची गरज आहे. अपोलो 11 चार दिवसांत चंद्रावर गेलं तिथं इगल लँडर चंद्रावर उतरवलं हेलं आणि अंतराळवीर चंद्रावर उतरुन, संशोधनानंतर लँडर ऑर्बिटरपर्यंत येईपर्यंत भरपूर इंधन लागलं. भविष्यात चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यासाठीही अशी मोठी रॉकेट आणि मोठ्या इंधनाची गरज लागेल. अर्थात चंद्रयान 3 चं यश हे या दिशेने इस्रोनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असेल हे निश्चित.