चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा आहे.
21 ऑगस्टला रशियाचं लुना 25 हे यान याच दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करताना क्रॅश झालं. समजा चंद्रयानला अडचणी आल्या तर काही पर्यायी व्यवस्था किंवा बॅकअप प्लॅन आहे का?
14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान - 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.
पण आयत्या वेळी अडचणी येऊ नये यासाठी इस्रोने दुसरी तारीख आणि जागासुद्धा निवडून ठेवली आहे. वेळ पडल्यास चंद्रयान 3 चं चंद्रावर 27 ऑगस्टला लँडिंग करण्याचीही इस्रोची तयारी आहे.
... तर 27 ऑगस्टला होणार लँडिंग
“23 ऑगस्टला 30 किलोमीटर उंचीवरून चंद्रयानचं लँडर मोड्यूल हळुहळू खाली उतरू लागेल. लँडिंगच्या दोन तासांपूर्वी कर्नाटकच्या ब्यालाळूमधील कमांड सेंटरमधून यानाला सर्व कमांड दिल्या जातील,” इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे संचालक नीलेश देसाई 23 तारखेला काय काय घडेल याबद्दल सांगतात.
“लँडरची तत्कालीन परिस्थिती, टेलिमेट्री अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल की नियोजित वेळी चंद्रावर उतरणं योग्य आहे की नाही.
सध्या तरी कुठल्याही अडचणी समोर येतील असं दिसत नाही, पण जर आयत्या वेळी परिस्थिती बदलली तर लँडिंगची तारीख बदलून 27 ऑगस्ट केली जाईल,” देसाईंनी माध्यमांना सांगितलं.
चंद्रावर उतरण्यासाठी दोन जागांची निवड
चंद्रयान उतरण्याची वेळ आणि जागा इस्रोने आधीपासूनच हेरून निश्चित करून ठेवल्या आहेत.
यापूर्वी जितकी लँडिंग्ज झाली आहेत ती विषुववृत्तावर झाली आहेत. याला कारणही तसंच आहे. विषुववृत्तावरील जमीन अधिक सपाट आणि उतरण्यासाठी तुलनेने सोपी आहे.
पण इस्रोने चंद्रयान उतरवण्यासाठी तुलनेने अधिक अवघड असा दक्षिण ध्रुवाचा प्रदेश निवडला आहे. दक्षिण ध्रुवावरची जमीन ओबडधोबड आहे.
नीलेश देसाई पुढे सांगतात, “इथला एक 4 बाय 2.4 किलोमीटर आकाराचा सपाट भूभाग हेरून ठेवला आहे.
हीच लँडिंग साईट असणार आहे. जर लँडिंग पुढे ढकलून 27 ऑगस्टला करावं लागलं तर त्यासाठी दुसरी जागा देखिल हेरून ठेवलेली आहे जी पहिल्या जागेपासून साधारण 450 किलोमीटर अंतरावर आहे.
ही जागा पहिल्या जागेइतकी सुयोग्य नसली तरी इथेही लँड करता येऊ शकतं याची खात्री आहे.”
चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर कसं उतरेल?
चंद्रयान-3 चं लँडर मॉड्यूल खाली उतरताना चंद्राच्या पृष्ठभागावर 90 अंशांच्या कोनात म्हणजे अगदी सरळ रेषेत असायला हवं.
सायंटिफिक प्रेस ऑर्गनायझेशनचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. टी. व्ही. व्यंकटेश्वरन सांगतात, "शंभर किलोमीटर उंचीवरून लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची 15 मिनिटांची प्रक्रिया 8 टप्प्यांत पूर्ण केली जाईल."
लँडर 100 किमीवरून 30 किमी उंचीवर आल्यावर, त्याचा वेग कमी करण्यासाठी रॉकेट प्रज्वलित केलं जाईल आणि साधारण दहा मिनिटात ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.4 किमी उंचीवर पोहोचेल. हा पहिला टप्पा आहे.
दुसऱ्या टप्प्यात यान 6.8 किमी उंचीवर उतरतं, तोवर लँडरचे पाय खाली फिरतील. यान योग्य ठिकाणी जातंय की नाही, याची पुष्टी लँडरवरची उपकरणं करतील.
तिसऱ्या टप्प्यात हे लँडर 800 मीटर उंचीवर, चौथ्या टप्प्यात 150 मीटर उंचीवर आणि पाचव्या टप्प्यात 60 मीटरपर्यंत खाली उतरेल.
सहाव्या टप्प्यात ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 10 मीटर उंचीवर येईल.
यानंतरचा टप्पा म्हणजे चंद्रावर अलगद उतरणं. या टप्प्यावर यानातलं इंजिन थांबतं, कारण त्यातून धूळ निर्माण होण्याचा, किंवा चंद्रावरची धूळ लँडरच्या सोलर पॅनल्सवर पडण्याचा धोका असतो.
हा शेवटचा टप्पा अवघ्या एका सेकंदात पूर्ण होईल. या टप्प्यावर तांत्रिक बिघाड झाला तरी यान चार पायांवर सरळच उतरेल.
लँडर सुरक्षितपणे उतरल्यानंतर काही काळानं त्याचा रॅम्प उघडेल आणि रोव्हर बाहेर येईल. रोव्हर लँडरची छायाचित्रं घेऊन पृथ्वीवर पाठवेल. हा सॉफ्ट लँडिंगचा आठवा आणि अखेरचा टप्पा आहे.
त्यानंतर पुढचे 14 दिवस लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करतील.
या संपूर्ण काळात इस्रो या यानासोबत संपर्क कसा साधणार आहे? तर त्यासाठी इस्रोच्या इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) या प्रणालीचा वापर केला जाईल. IDSN हे एक कम्युनिकेशन अँटेनांचं जाळं आहे जे बंगळुरूजवळ ब्यालाळू इथे 2008 साली चंद्रयान-1 मोहिमेसाठी उभारण्यात आलं होतं.