केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर

रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (09:27 IST)
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज (16 फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची  शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी होत आहे (Kejriwal Oath Taking Ceremony). या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केजरीवालांचा शपथविधी सोहळा सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुरु होणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली (Kejriwal Oath Taking Ceremony).
 
केजरीवालांच्या शपथविधी  सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह निमलष्करी दलातील 2,000 ते 3,000 जवान तैनात असतील. या दरम्यान ड्रोनच्या मदतीने सर्व कार्यक्रमावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली
 
केजरीवालांसोबत व्यासपीठावर कोण?
 
दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे विविध क्षेत्रातील 50 जण केजरीवाल यांच्यासोबत मंचावर असतील. यामध्ये शिक्षक, बस मार्शल, सिग्नेचर ब्रिजचे आर्किटेक्ट आणि शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती आपचे नेता मनिष सिसोदिया यांनी दिली.
 
मोदींनाही निमंत्रण
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आपने आधीच सांगितले होते की, मुख्यमंत्री किंवा इतर राज्यातील राजकीय नेते या कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत. कारण हा ‘दिल्लीकेंद्रित’ कार्यक्रम असेल.
 
‘छोट्या मफलरमॅन’लाही निमंत्रण
 
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ग्रहण सोहळ्यात दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी आपच्या कार्यायल परिसरात आपल्या वडिलांसोबत केजरीवालांच्या गेटअपमध्ये एक छोटा मफरमॅन पोहोचला होता. या छोट्या केजरीवाल म्हणजेच एक वर्षाच्या अव्यान तोमरलाही या सोहळ्याचं खास निमंत्रण आहे.
 
शपथवुधी सोहळ्याला एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता
 
शपथविधी सोहळ्यासाठी रविवारी रामलीला मैदानावर तब्बल एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असा दावा आपकडून करण्यात आला आहे. “सुमारे एक लाख लोक या सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिक गेट क्रमांक 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सहा प्रवेशद्वारातून रामलीला मैदानात प्रवेश करु शकतील”, असं त्यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती