अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीवच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.
अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.
चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.