रोज कमावून आपलं आणि आपल्या कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीला हातावर पोट असणारी व्यक्ती म्हणतात. कल्पना करा की जर अशा एखाद्या व्यक्तीचे हातच गेले तर. अशी वेळ तर शत्रूवर पण येऊ नये असं तुम्ही म्हणाल. पण खरोखरच अशी वेळ एका पेंटरवर आली होती. परंतु त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा चमत्कार डॉक्टरांनी घडवून आणला आहे, याची ही गोष्ट. रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या एका 45 वर्षीय पेंटरला हात प्रत्यारोपणामुळे आता नवं जीवन मिळालं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. हातांचे प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हतं. हे प्रत्यारोपण पूर्ण करण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या दरम्यान हातांच्या धमन्या, स्नायू आणि मज्जातंतू जोडण्यात आलेत.
रेल्वे अपघातात गमावले हात
दिल्लीतील नांगलोई येथील रहिवासी आणि व्यवसायाने पेंटर असलेले राज कुमार त्यांच्या सायकलवरून घराजवळील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला होता. राज कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "माझ्या पायाला दुखापत झाल्यामुळे मी लंगडत होतो. अशातच माझी सायकल रुळांवरून घसरली आणि मध्येच अडकली. मी माझ्या हाताने सायकल ओढण्याचा प्रयत्न करत होतो. पण सायकल निघाली नाही आणि माझा अपघात झाला." कुमार त्यांच्या दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून होते असं रुग्णालयातील प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉ. महेश मंगल यांनी सांगितलं. 19 जानेवारी रोजी शल्यचिकित्सकांच्या टीमने गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केलं. त्यांनी हाडे, धमन्या, शिरा, स्नायू, नसा आणि त्वचा आदी भाग यशस्वीपणे जोडले. डॉ. महेश मंगल यांनी सांगितलं की, या शस्त्रक्रियेत अचूकता महत्त्वाची होती. शस्त्रक्रियेनंतर पंधरा दिवसांनी त्यांच्या शरीरावरील पट्ट्या काढण्यात आल्या. अपघातानंतर, कुमार यांच्याकडे एकतर प्रोस्थेटिक्स किंवा हात प्रत्यारोपण हेच पर्याय उरले होते. त्यांनी प्रोस्थेटिक्स वापरण्यास सुरुवात केली पण तोही पर्याय फोल ठरला. शेवटी हातांचे प्रत्यारोपण ही एकमेव आशा उरली असल्याचं डॉ. महेश सांगतात. त्यांनी पुढे सांगितलं की, "त्यावेळी उत्तर भारतातील एकाही केंद्राला हात प्रत्यारोपण करण्याची परवानगी नव्हती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, सर गंगाराम रुग्णालयाला हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची परवानगी मिळाली. अशी परवानगी मिळवणारे ते उत्तर भारतातील पहिले रुग्णालय ठरले." "जेव्हा आम्ही हात प्रत्यारोपणासाठी संभाव्य रुग्णाच्या शोधात होतो, तेव्हा कुमार आमच्या प्रतीक्षा यादीत होते. प्रत्यारोपणाच्या प्रोटोकॉलनुसार, आवश्यक तपासण्या केल्या गेल्या आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राज कुमार यांच्यावर शस्त्रक्रिया करायचं ठरलं."
अवयवदानामुळे मिळाली दुसरी संधी
दिल्लीतील एका शाळेच्या निवृत्त महिला उप-प्राचार्याच्या अवयवदानामुळे कुमार यांना आयुष्यात दुसरी संधी मिळाली. वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी या महिलेला ब्रेन-डेड घोषित केलं होतं. या महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. कुमार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण आयुष्यभर इम्युनोसप्रेसेंट्सवर असेल. डॉक्टरांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "कुमार यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी आहे. त्यामुळे त्यांना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ते आता आयुष्यभर अँटी-रिजेक्शन औषधांवर असतील. यामध्ये यकृत किंवा किडनी प्रत्यारोपणासाठी दिलेली इम्युनोसप्रेशन औषधे देखील समाविष्ट आहेत." डॉक्टरांनी सांगितलं, "कुमार यांच्या हाताच्या संवेदना परत येत आहेत, पण नसा पुन्हा जोडायला थोडा वेळ लागतो. त्यांनी कोपर हलवायला सुरुवात केली आहे. पण हात आणि मनगट हलवायला थोडा वेळ लागेल." "त्यांना वेदना, उष्णता अशा संवेदना अनुभवायला थोडा वेळ लागेल. किमान सहा ते सात महिने लागतील. खूप गरम किंवा खूप थंड असलेल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करताना खबरदारी घ्यावी लागेल. शस्त्रक्रियेनंतर दिसणाऱ्या खुणांबद्दल डॉक्टरांनी सांगितले की, त्या फारशा लक्षात येण्यासारख्या नाहीत, कालांतराने त्या कमी होतील.