कर्नाटक : परजातीतल्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीचा वडिलांनीच केला खून

रविवार, 12 जून 2022 (10:38 IST)
"मी तिला कायम म्हणायचो की आपली जात वेगळी आहे. आपण भेटायला नको. पण, ती म्हणायची की पुढच्या वर्षी 18 वर्षं पूर्ण झाल्यावर माझ्याशीच लग्न करणार."
 
कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातल्या पेरियापटना तालुक्यातील मंजूनाथ (खरं नाव न छापण्याच्या शर्तीवर) सांगत होते.
 
मंजूनाथ अनुसूचित जातीमधून येतात आणि त्यांना जी मुलगी आवडायची ती सवर्ण वोक्कालिंगा समाजाची होती. मात्र, आज ती हयात नाही. सोमवारी रात्री तिच्या वडिलांनीच तिचा खून केला. वडिलांनी स्वतः पेरियापटना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
 
पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून दोन जातीतलं प्रेम आणि वादाचं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते. पण, 50 वर्षीय वडिलांनी स्वतःच्या मुलीचाच खून केला. पोलिसांसाठीही हा धक्का होता.
 
हे प्रकरण पोलिसांकडे पहिल्यादा आलं ते वडिलांनी मुलीतर्फे छेडछाडीची तक्रार दाखल केली तेव्हा. मुलीच्या कॉलेजजवळच तिचा विनयभंग करण्यात आल्याचं वडिलांचं म्हणणं होतं.
 
मंजूनाथ सांगतात, "तक्रार दाखल करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचं तिनं सांगितलं होतं. पोलिसांकडे तक्रार केली नाही तर मला ठार करतील, अशी धमकी तिच्या वडिलांनी दिली होती. पोलिसांनी मला मारहाण करून नंतर सोडून दिलं होतं."
 
मंजूनाथ पुढे सांगतात, "वडिलांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दोन पोलीस शिपाई माझ्याशी बोलायला आले होते. स्वतःच्या सुरक्षेसाठी बाहेर न पडण्याचा आणि लपून रहाण्याचा सल्ला त्यांनी दिला."
 
24 वर्षीय मंजूनाथ अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि जवळपास 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या या नात्याची सुरुवात झाली. ते सांगतात, "आम्ही बरेचदा फोनवरच बोलायचो. कधी-कधी ती घरून काही न खाताच यायची. तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जायचो. मग मी माझ्या स्कूटरने तिला कॉलेजमध्ये सोडायचो."
 
मंजूनाथ मेलहल्ली तर तरुणी कागुंडी गावचे होते. मात्र, दोन्ही गावांमध्ये काही तणाव होता, असं मंजूनाथ आणि पोलीस दोघांनाही वाटत नाही. या भागात तंबाखूची शेती होते आणि तरुणीचं गाव तंबाखूची मोठी बाजारपेठ आहे.
 
महिनाभर समुपदेशन
पहिल्या तक्रारीनंतर तरुणीच्या वडिलांनी आणखी दोन वेळा मंजूनाथविरोधात फिर्याद दाखल केली होती. तिसरी तक्रारही मुलीतर्फेच करण्यात आली होती. मंजूनाथ सांगतात, "तिच्या वडिलांनी तिला चपलेने मारहाण केली होती. मी आणि माझे मित्र कॉलेजमध्ये जाऊन तिची छेड काढतो, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती."
 
मंजूनाथ आणि त्यांचे मित्र काही स्थानिक दलित तरुणांसोबत आपल्याविरोधात दाखल केलेली फिर्याद चुकीची असल्याचं सांगायला गेले होते. "पण, पोलिसांनी आम्हाला जायला सांगत मुलीशी एकट्यात बातचीत केली."
 
मंजूनाथ पुढे सांगतात, "तिने पोलिसांना सांगितलं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणून तिचे वडील मला ठार करू इच्छितात. पुढच्या वर्षी सज्ञान झाल्यावर माझ्याशीच लग्न करणार, असंही ती म्हणाली होती."
 
"तिची आईदेखील तिथेच होती. ती मला म्हणाली की तिचं लग्नाचं वय झाल्यावर तिची नीट काळजी घे. पण, नंतर तिला म्हैसूरला नेण्यात आलं."
 
म्हैसूरमध्ये मुलींच्या समुपदेशन केंद्रात जवळपास महिनाभर तिचं काउंसिलिंग करण्यात आलं. कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये या समुपदेशन केंद्राची मदत घेतली जाते.
 
म्हैसूरमधल्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा कमला एच. टी. यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "(मंजूनाथ सोबतच्या संबंधांवरून) तिच्या आईवडिलांनी तिला धमकावलं होतं आणि मारहाणही केली होती."
 
ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाचे माजी सदस्य आणि वकील पी. पी. बाबूराज म्हणतात, "या नात्यामुळे कुटुंबावर समाजाचाही दबाव होता, असं वाटतं."
 
"डिसेंबरमध्ये मुलीच्या वडिलांनी मला काठीने मारहाण केली होती. लोकांनी मला वाचवलं. पण, एका मित्राने सल्ला दिला म्हणून मी या प्रकरणी तक्रार नोंदवली नव्हती", असं मंजूनाथ सांगतात.
 
प्रकरणाचा तपास
कमला एच. टी. म्हणतात, "ज्युवेनाईल जस्टिस कायद्यातील तरतुदींनुसार तरुणीचं समुपदेशन सुरू होतं. तिला तिच्या आई-वडिलांना भेटूही दिलं जात होतं. एक दिवस अचानक ती म्हणाली की तिला तिच्या आई-वडिलांसोबत जायचं आहे. ती अचानक कर्मचाऱ्यांवर नाराज झाली होती."
 
"आधी ती म्हणाली होती की तिला तिच्या घरी परत जायचं नाही आणि आता जायचं होतं. त्यामुळे पुन्हा तिचं समुपदेशन करण्यात आलं. पण, ती म्हणाली की तिच्या आईवडिलांनी तिला त्रास न देण्याचं आश्वासन दिलं आहे."
 
तरुणीच्या आईवडिलांनी तिला मंजूनाथशी लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं का, याची खातरजमा पोलिसांनी केली नव्हती.
 
म्हैसूरचे पोलीस अधीक्षक चेतन आर. म्हणाले, "आम्हीसुद्धा प्रकरणाचा तपास करतोय. त्यामुळे हे खरं आहे की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही. या खुनात ते एकटेच होते की आणखी कुणी सहभागी होतं, याचा आम्ही तपास करतोय."
 
कमला एच. टी. म्हणाल्या, "20 मे 2022 रोजी तिला घरी नेण्याआधी आम्ही तिच्या आई-वडिलांशी बोललो होतो आणि कायद्यातील तरतुदींनुसार मुलांसोबत कसं वागावं, याचे नामनिर्देश असणाऱ्या आदेशाची प्रतही त्यांना दिली होती. तिच्याबरोबर जे झालं ते ऐकून फार वाईट वाटलं." मंजूनाथ म्हणतात, "मी माझ्या वडिलांना राजी करेन, असं ती म्हणाली होती."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती