देशात सुमारे २० टक्के गर्भवती महिलांना मधुमेह

Webdunia
‘जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह संघा’ने यंदाचे वर्ष हे ‘महिला व मधुमेह वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून जवळपास २० टक्के गर्भवती महिलांना मधुमेह होत असल्याचे दिसून आले आहे.
 
भारतात आजघडीला सहा कोटी ९२ लाख लोकांना मधुमेह असल्याची आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. साधारणपणे लोकसंख्येच्या १० टक्के लोक हे मधुमेही असून त्यात महिलांचे प्रमाण हे खूप मोठे आहे. भारतातील महिला व त्यातही गर्भवती महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून जवळपास २० टक्के गर्भवती महिलांना मधुमेह असल्याचे ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ डायबिटिक’चे अध्यक्ष डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. त्यामुळे गर्भवती महिलांना नियमितपणे मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. प्रामुख्याने महिलांमधील वाढता ताण हे मधुमेहाचे कारण असून त्यातही शहरी भागात नोकरदार महिला तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी महिला या आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. पुरुषप्रधान संस्कृतीत एकूणच महिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असून खाण्यापिण्याच्या सवयी, कौटुंबिक जबाबदारी व कामाचा ताण यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते. 

संबंधित माहिती

पुढील लेख