नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

बुधवार, 24 मे 2023 (15:00 IST)
येत्या 28 तारखेला संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सोहळ्याला राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा प्रकार असंवैधानिक असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
 
28 मेला विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. या मुहुर्तावरसुद्धा विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
 
हा दिवस म्हणजे भारताच्या सर्वोच्च नेत्यांचा अपमान असल्याचं विरोधी पक्षांचं मत आहे.
 
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या निर्णयावर टीका करताना म्हटलं, “ज्या व्यक्तीने कायम महात्मा गांधींना विरोध केला अशा व्यक्तीच्या जयंतीला सरकारने हे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे.”
 
भाजपने मात्र त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ही वास्तू म्हणजे भारतीयांसाठी गर्वाची बाब असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
जानेवारी 2021 मध्ये संसदेच्या नव्या इमारतीचे कामकाज सुरू झाले होते.
 
ही चार मजली इमारत HCP Design या कंपनीने केलं आहे. ही टाटाची कंपनी आहे. या नवीन वास्तूत आसनक्षमता वाढवण्यात आली आहे. 900 कोटी रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात आली आहे.
 
सध्याच्या इमारतीचाही वापर केला जाणार आहे. गेल्या आठवड्यात या इमारतीच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मते इमारतीचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हायला हवं.
 
“संसद ही भारतातली सर्वोच्च इमारत आहे आणि राष्ट्रपती हे सगळ्यात महत्त्वाचं घटनात्मक पद आहे. त्या संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतात.” असं ते म्हणाले.
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे ट्टिरवर लिहितात, “राष्ट्रपती मुर्मू यांनी जर त्या इमारतीचे उद्धाटन केलं तर इथल्या लोकशाही मूल्यांचा आणि घटनात्मक इमारतीचा मान ठेवला जाईल.”
 
भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांच्या मते हा सगळा काँग्रेसचा उर बडवण्याचा प्रकार आहे.
 
राहुल गांधी अशा प्रसंगी अपशकुन असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यानुसार काँग्रेस या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार आहे. 2020 मध्ये कोरोना काळात या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं. तेव्हा इतर विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसने बहिष्कार घातला होता.
 
19 विरोधी पक्षांचा बहिष्कार
नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
 
सध्या विरोधात असलेल्या 19 समविचारी पक्षांनी संसद उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या सर्व पक्षांनी एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून संबंधित कार्यक्रमाचा निषेध करत असल्याची माहिती दिली.
 
यामध्ये सहभागी असलेले विरोधी पक्ष खालील प्रमाणे -
 
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
तृणमूल काँग्रेस
द्रविड मुनेत्र कळघम
जनता दल (संयुक्त)
आम आदमी पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शिवसेना (उबाठा)
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
समाजवादी पक्ष
राष्ट्रीय जनता दल
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
इंडियन युनियन मुस्लीम लीग
झारखंड मुक्ती मोर्चा
नॅशनल कॉन्फरन्स
केरळ काँग्रेस (मणि)
रिव्हल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी
विदुथलाई चिरुथैगल कच्छी
मारूमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम
राष्ट्रीय लोक दल
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती