शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत, ज्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पाठवण्यात आली. पंतप्रधान मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल, कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह अनेकांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतेक बिहारमधील आहेत आणि त्यांची संख्या नऊ असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये आठ जण दिल्लीचे आणि एक हरियाणाचा होता. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर पोहोचले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म 13 आणि 14 वर चेंगराचेंगरी झाली.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेत बाधित झालेल्या लोकांसाठी भरपाईची घोषणा करण्यात आली आहे आणि भरपाईचे वाटपही केले जात आहे.