बूटासिंगच्या मुलाची लाच घेतल्याची कबूली

अनुसूचीत जातींच्या केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष बुटा सिंग यांचा मुलगा सर्बजोत उर्फ स्विटी सिंगने याने एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचे कबूली दिली आहे. नाशिकच्या घंटागाडी ठेकेदाराकडून अँट्रोसिटीचे गुन्हे मागे घेण्यासाठी ही लाच घेतल्याचे त्याने म्हटले आहे.

सर्बजोतसह आणखीन तीन जणांना या प्रकरणी सीबीआयने अटक केली होती. त्यांना शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात हवाला रॅकेटचे धागेदोरे सापडण्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.

नाशिकचे ठेकेदार रामराव पाटील यांच्याकडे तीन कोटी रुपयांची लाच मागण्यात आली होती त्यापैकी एक कोटी रुपये देण्यात आले. या प्रकरणावर गेले काही दिवस सीबीआयचे अधिकारी पाळत ठेवून होते.

ठेकेदार पाटील याच्याकडे नाशिक महापालिकेच्या घंटागाडीचा ठेका आहे. त्याने आपल्या शंभर कर्मचार्‍यांच्या खात्यावर पनवेलच्या एका पतसंस्थेकडून प्रत्येकी दहा लाखाचे कर्ज परस्पर घेतले होते. ही बाब बाहेर आल्यानंतर तो अडचणीत सापडला होता. त्यातच एका कर्मचार्‍याने अल्पसंख्याक आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. यातून बाहेर पडण्यासाठी पाटीलने बुटासिंग यांच्या चिरंजीवांशी संपर्क साधला. हे प्रकरण निस्तरण्यासाठी सरबज्योतसिंगने पाटील यांच्याकडे तीन कोटीची मागणी केली होती. यापैकी एक कोटी घेत असतानाच सरबज्योतसिंग पकडला गेला.

वेबदुनिया वर वाचा