मनसे नेते राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे पडसाद राजधानी पर्यंत उमटले होते. त्यांच्यावर लोकसभा आणि राज्यसभेतही जोरदार टीका करण्यात आली होती.
अखेर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या दबावाने राज्य सरकारला त्यांना अटकही करावी लागली होती. यानंतर त्यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी त्यांच्या विरोधात पुरावा मिळत नसल्याचे राज्य पोलिसांचे म्हणणे होते.
आता राज यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानाला राज्यातील पोलिस तुकड्याच साक्षीदार असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करणार का असा प्रश्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी उपस्थित केला आहे.
काल शिवाजी पार्क मैदानावर राज प्रक्षोभक वक्तव्य करणार हे गृहीत धरत मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता.
यात शीघ्र कृती दलाच्या दहा तुकड्या, मुंबई पोलिसांच्या 7 तुकड्या, 5 पोलिस उपायुक्त, 8 निरीक्षक, 90 उपनिरिक्षक आणि 41 महिला पोलिसांचा समावेश होता.
एवढे संख्याबळ असूनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आता या सभेला 24तास उलटत नाहीत तोच पोलिस राज यांना अटक करणार का? असा प्रश्न सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनीच उपस्थित केला आहे.