मुंबईतील वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने चिरडून महिलेचा मृत्यू झाला आहे. बीएमडब्ल्यू कार शिवसेना शिंदे गटातील राजेश शहा यांचा मुलगा मिहीर गाडी चालवत असताना त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला मागून धडक दिली. या अपघातात महिला मरण पावली या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा हा अपघातानंतर फरार झाला होता. तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.अखेर 72 तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फरार वरळी हिट अँड रन आरोपी मिहिरला पकडण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले कारण मिहीर आणि त्याची आई आणि बहिणींनी मोबाईल फोन वापरणे बंद केले होते. दरम्यान, पोलिसांचे पथक प्रत्येक सुगावा शोधत होते.
मिहीर, त्याची आई, दोन बहिणी आणि एक मित्र शाहपूर येथील एका रिसॉर्टमध्ये राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र काल रात्री मिहीर कुटुंबापासून विभक्त होऊन विरारला आला होता. आज सकाळी त्याने 15 मिनिटांसाठी मित्राचा फोन ऑन करताच पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले आणि त्यानंतर पोलिसांनी मिहिरला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तो वांद्रे येथील कलानगरजवळ बीएमडब्ल्यू सोडून गोरेगाव येथे मैत्रिणीच्या घरी गेला.
संपूर्ण हकीकत कळल्यानंतर मैत्रिणीने मिहिरच्या बहिणीला फोन करून सांगितले. त्यानंतर मिहीरची बहीण गोरेगावला आली आणि मिहीरला बोरिवलीला घरी घेऊन गेली. तेथून तो संपूर्ण कुटुंब आणि मित्रासह शहापूरला पळून गेला. तेथे ते सर्व एका रिसॉर्टमध्ये थांबले. पोलिसांनी आता मिहीरची आई मीना, बहिणी पूजा आणि किंजल आणि त्याचा मित्र अवदीप यांनाही ताब्यात घेतले आहे.