भीषण अपघात, कंटेनरने महिलेला चिरडले, नंतर दुचाकी उलटली, 3 ठार

शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (12:52 IST)
Latur News: लातूर जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उदगीर-निलंगा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने प्रथम महिलेला चिरडले आणि नंतर दोन दुचाकीस्वारांवर उलटले. ज्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, झरी येथील 20 वर्षीय कृष्णा अर्जुन जाधव आणि 40 वर्षीय कस्तुरा परमानंद जाधव यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही आठ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या मोटारसायकलवरून सकाळी सहा वाजता शेताकडे निघाले होते. ते उदगीर निलंगा रोडवर आले असता समोरून येणाऱ्या कंटेनरने अक्षरा किशन जाधव या महिलेला जोरदार धडक दिली. दुचाकी चालवत असलेल्या कृष्णा जाधव यांनी अपघात झाल्याचे पाहून मोटारसायकल तेथेच थांबवली. मात्र कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारसायकलवर उलटला.
 
या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले मात्र कोणालाही वाचवता आले नाही. दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.
 
माहिती मिळताच निलंगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ठार झालेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कै.कस्तुरबाई यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व पती असा परिवार आहे. तर कृष्णा जाधव यांच्या कुटुंबात आई, वडील आणि एक बहीण आहे.
 
या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती