लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. अंगणवाड्या सुरू करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना कामावर उपस्थित राहण्यासाठी दोन-तीन नोटिसा बजावल्या आहेत. बुधवारपर्यंत नोटिसा बाजावलेले कर्मचारी कामावर उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर बडतर्फीची म्हणजेच सेवेतून कमी करण्याची कारवाई केली जाणार आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करावी व इतर मागण्यांसाठी अंगणवाडीचे कर्मचारी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत. अंगणवाडीतील बालकांचे शिक्षण व पोषण आहाराचा विषय गंभीर बनला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील २ हजार ३२४ अंगणवाड्या गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना कामावर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बाजावल्या होत्या. त्या नंतर काही अंगणवाडी सेविका व मदतनिस कामावर परतल्या आहेत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात अंगणवाडया बंद आहेत. यामुळे बंद अंगणवाड्यांच्या कर्मचा-यांना शेवटची नोटीस देऊन बुधवारपासून अंगणवाड्या न उघडल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची करवाई होणार आहे.
जिल्ह्यातील २ हजार ३२४ अंगणवाड्यांत ३ ते ६ या वयोगटातील ६३ हजार बालके पूर्व शालेय शिक्षण घेतात. या बालकांना खिचडी, गोड लापशी असा या अंगणवाडीमध्ये पोषण आहार नियमित दिला जातो. अंगणवाडीतील पूर्व शालेय शिक्षणातून व पोषण आहारातून विद्यार्थ्यांची शारीरिक व बौध्दिक वाढ होत असते मात्र गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या विकासाचा हा पाया ढासळला आहे.