केंद्राच्या दिरंगाईमुळेच राज्यातल्या योजना लांबणीवर पडत असल्याची तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर डागलीय. सामना वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरेंनी ही आगपाखड केलीय. शेतकऱ्यांना वेळेत मदत देऊ शकत नसल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडलं आहे. ‘केंद्राकडून मदत आलेली नाही. जीएसटीचे १५ हजार कोटी बाकी होते. डिसेंबपमध्ये पत्र दिल्यानंतर ४ ते ४.५ हजार कोटी आले. केंद्र सरकार नेमकं काय करतंय हे लोकांना कळालं पाहिजे. केंद्रातून वेळेवर पैसे आले तर मदत लवकरात लवकर देण्यात येईल.’ असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मराठवाडा काही वर्ष सतत दुष्काळाचा सामना करतो आहे. पाण्याचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या आहे. पंकजांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला म्हणून धन्यवाद. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकार संवेदनशील आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पंकजा मुंडे यांचे आंदोलन सुरू होण्याआधीच सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
नाईट लाईफवर विरोधकांना उत्तर
नाईट लाईफच्या टीकाकारांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. नाईट लाईफ हे कष्टकऱ्यांसाठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. नाईट लाईफचा अर्थ केवळ पब, बारपुरता संकुचित नाही असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘नाईट लाईफमध्ये लाईफ हा शब्द महत्त्वाचा आहे. मुंबई झोपत नाही म्हणतात. तर अशा कष्टकऱ्यांना जर त्यांना आवश्यक असलेलं जेवण उपलब्ध करुन द्यायच्या की नाही द्यायच्या. मुंबईकर घरी थकून येतो तेव्हा थकलेला असतो. पण जेव्हा तो बाहेर पडतो. तेव्हा सगळं बंद असतं. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी पोलीस २४ तास जागा असतो. पोलीस जागतात म्हणून आपण झोपतो. रात्रीच्या वेळेचा वापर चांगल्या कामासाठी होऊ शकतो. इतर सेवा सुरु असतात. रात्री पाळी असते. मग दुकानं का उघडी असू नयेत,’ असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.