वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला तरुणाने केली मारहाण

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (15:43 IST)
मुंबईतल्या कल्याणमध्ये एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला तरुणाने मारहाण केली आहे.नाकाबंदीदरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबवल्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यावर मारहाण केली.पोलिसांनी या प्रकरणामध्ये संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आहे.राहुल रोकडे अस आरोपीचं नाव आहे.या प्रकरणामध्ये कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांनी नाकाबंदी सुरु आहे.वाहतूक पोलीस दलातील प्रकाश पटाईत यांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असताना एका व्यक्तीला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आडवलं. हेल्मेट न घालता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरु असतानाच रोकडे तेथे दुचाकीवरुन आला. पटाईत यांनी रोकडेला थांबवून त्याच्याकडे हेल्मेटसंदर्भात विचारणा केली. मात्र रोकडे त्यांना कट मारुन निघून गेला. काही अंतरावर गेल्यानंतर रोकडे पुन्हा परतला आणि पोलिसांशी हुज्जत घालू लागला.

कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण काही अंतरावरुन पुन्हा पोलीस उभे असणाऱ्या ठिकाणी आला आणि पोलिसांशी हुज्जत घालू लागला.रस्त्यावरील दगड उचलून तो पोलिसांवर धावून गेला. मात्र इतर पोलिसांनी त्याला समजावलं.या तरुणाने स्वत:ला जखम करुन घेतल्याने पोलिसांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.मात्र संतापलेल्या अवस्थेत रोकडेने पटाईत यांच्या डोक्याला दडगाने जखम केली.
 
इतर सहकाऱ्यांनी तातडीने पटाईत यांना रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये दाखल केलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी रोकडेला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती