मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज झाला कमी

बुधवार, 20 एप्रिल 2022 (09:04 IST)
मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसेच्या मागणीवर मुंबईत धुमशान सुरू असताना, मुंबईतील 72 टक्के मशिदींनी पहाटेचा भोंगा बंद केला असल्याचं समोर आलंय. भोंग्याचा वापर न करताच पहाटेची अजान केली जात असल्याचे पोलिसांनी गोपनीयरीत्या घेतलेल्या आढाव्यात पुढे आलं आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात मुंबईतील सर्व धर्मांचे धर्मगुरू, मौलाना यांची पोलिसांनी बैठक बोलावली. या बैठकीत ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेला आदेश उपस्थितांना अवगत करून देण्यात आला.
 
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ध्वनिप्रदूषण केल्यास कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये शिक्षेची तरतूद कोणती हेदेखील धर्मगुरू, मौलवींना विस्तृतपणे सांगण्यात आले. कायदा मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा शब्दात पोलिसांनी समज दिल्याचे समजते.
 
धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विविध शाखा लहानसहान घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात मुंबईतील 72 टक्के मशिदींनी पहाटे लाऊडस्पीकरवर होणारी अजान बंद केली आहे. तर, काहींनी न्यायालयाने परवानगी दिलेल्या पातळीपेक्षा भोंग्याचा आवाज कमी ठेवला आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नसून इतरांनाही त्या आवाजाचा त्रास होत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती