राज्यातील पहिलं मँग्रोव्ह पार्क गोराई येथे उभे राहत आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर अखेर दोन वर्षांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मार्च 2023 मध्ये मँग्रोव्ह पार्कच काम पूर्ण होईल अशी माहिती मँग्रोव्ह फाउंडेशनने दिली. मुंबईत मँग्रोव्हज पार्क उभारण्यावर 2017 पासून विचार सुरू होता. गोराई आणि दहिसर येथील खाडी किनारी मँग्रोव्ह पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील गोराई येथे पहिला प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोरिवली येथील गोराई खाडी जवळील 8 हेक्टर जागेवर महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे अशी माहिती मँग्रोव्हज सेलच्या उप वनसंरक्षक अधिकारी निनू सोमराज यांनी दिली. मँग्रोव्ह पार्कचे काम सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. त्यातील केंद्र सरकार,मुंबई महानगरपालिका तसेच मुंबईत उच्च न्यायालयाच्या परवानग्या मिळवण्यात यश आले आहे. पार्क साठी आवश्यक जागेपैकी वनखात्याच्या अखत्यारीत नसलेली 0.2 हेक्टर जमीन हस्तांतरण करणे गरजेचे होते. ती जागा देखील हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती निनू सोमराज यांनी दिली.