एका रुग्णामागे जवळपास १५ ते २० संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:25 IST)
मुंबईत वाढलेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनासह राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यात सहवासितांच्या शोधावर मुंबई महानगरपालिका अधिक भर देत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शहर उपनगरात एका रुग्णामागे जवळपास १५ ते २० संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येतो अशी माहिती पालिकेने दिली आहे.रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे कमी केल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहवासितांचा शोध आणि निदान यावर अधिकाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तापमानातील बदल, रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेण्यातील शिथिलता, मास्क वापरण्यास टाळाटाळ, सार्वजनिक समारंभातील गर्दी,  अनलाॅकचा पुढचा टप्पा आणि कोरोनाविषयी गांभीर्याबद्दल अनभिज्ञता अशा विविध कारणांमुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासह इतरांच्या सुदृढ, निरोगी आरोग्याचा विचार करून मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. संवेदनशील गटातील व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी, अशी माहिती श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. कीर्ती सोनावणे यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती