नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद चिघळणार; कृती समितीची बैठक निष्फळ

सोमवार, 21 जून 2021 (08:18 IST)
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत लोकनेते दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. कृती समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. 
 
यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती. त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी विमानतळाऐवजी इतर प्रकल्पाला दि.बा. यांचे नाव सुचविण्याची सूचना केली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी विमानतळाऐवजी इतर प्रकल्पाला दिबांचे नाव देण्याबाबत तयारी दर्शविली होती. तर भाजपसह इतर प्रकल्पग्रस्त नेते दिबांच्या नावावर ठाम होते. याबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी देऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते ही बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत ठाम भुमिका घेतली. इतर प्रकल्पाला दिबांचे नाव सुचविण्याचे पुनरूच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करीत नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळा ऐवजी दुसरे कोणतेच पर्याय मान्य नसल्याची भूमिका घेतली.
 
यावेळी कृती समितीने दिबांच्या नावाला पाठिंबा दर्शविणारे स्थानिक ग्रामपंचायती तसेच विविध प्राधिकरणाचे ठराव मुख्यमंत्र्याना सादर केले.या ठरावांची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरतील अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याने अशाप्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती