World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला?

रविवार, 20 जून 2021 (15:09 IST)
फोटो साभार :सोशल मीडिया 
जान्हवी मुळे
सन 1947. फाळणीनंतरचे दिवस. स्वातंत्र्याचा आनंद मागे पडला होता. नव्यानं आखलेल्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूला नव्या राष्ट्रांमध्ये जातीय दंगली पेटल्या होत्या. एकीकडे पंजाबात निर्वासितांचे जथ्थे कधी पायी, कधी ट्रेननं, मिळेल त्या वाहनातून मिळेल त्या मार्गानं भारतात येत होते. त्याच वेळी सिंध प्रांतातून लाखो लोक जहाजांतून मुंबईकडे निघाले.
 
जीव मुठीत धरून हजारो सिंधी हिंदू तेव्हा कराची बंदरात जमा व्हायचे. एका मागोमाग एक जहाजांत भरून त्यांना भारतात पाठवलं जायचं. काही जहाजं गुजरातमध्ये गेली आणि बरीचशी मुंबईच्या किनाऱ्याला लागली.
 
नानिक मंगलानी आणि त्यांचे कुटुंबीय त्यापैकीच एक. 75 वर्षांचे नानिक त्या दिवसांच्या आठवणी सांगताना आजही भावूक होतात. "माझा जन्म 1945 सालचा. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा मी जेमतेम अडीच वर्षांचा होतो. तरीही बऱ्याच गोष्टी आठवतात."
 
मंगलानी यांचं कुटुंब सिंधमध्ये लारकान जिल्ह्यात राहायचं. "रतोडेरो जवळच्या बंगलडेरोमध्ये माझे बाबा शेती करायचे. छानसं गाव होतं, टेकडी, शेती होती. ते दिवस समाधानाचे होते. पण फाळणीनंतर काही दिवसांनी वातावरण बदलू लागलं. परिस्थिती एवढी बिघडली की शेवटी काही आठवड्यांनी आम्हाला सगळं सोडून तिथून उठून इथे यावं लागलं. बोटीचा भयानक प्रवास करून आम्ही मुंबईत आलो होतो."
रातोरात बेघर झालेले लोक आपलं गावच नाही तर शतकानुशतकांचा वारसा मागे सोडून निघाले होते. कुणाला दुःख अनावर झालं होतं, कुणी रिकाम्या पोटी थकून भागून गेलं होतं तर कुणाला भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही करवत नव्हती.
 
आपल्याच घरात कुणी परके झाले होते आणि आता निर्वासित म्हणून परक्या देशात आपलं घर बनवणार होते.
बोटी मुंबईत पोहोचल्यावरही निर्वासितांची परवड संपली नव्हती. बस, ट्रक, मिळेल त्या वाहनात बसवून त्यांना सायन, बोरिवली, मढ आयलंड अशा शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. तिथून कुणाची रवानगी पुढे पिंपरी, कोल्हापूर अशा दूरच्या शहरांत झाली तर अनेकांना मुंबईच्या उत्तरेला कल्याण कँपमध्ये पाठवण्यात आलं.
 
एकेकाळी ब्रिटिश लष्कराचा तळ असलेल्या याच परिसरात पुढे सिंधी लोकांची भारतातली सर्वांत मोठी वसाहत बनली आणि इथे मुंबई परिसरातलं एक महत्त्वाचं शहर उभं राहिलं, पसरत गेलं. ही त्याच शहराची, उल्हासनगरची कहाणी आहे.
कल्याण कँप ते उल्हासनगर
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी कल्याण आणि अंबरनाथच्या दरम्यान पाच छावण्या उभारल्या होत्या. उल्हास नदीकाठच्या या प्रदेशातूनच मध्य रेल्वे जातो, जो आजही मुंबईला कर्जत, पुणे आणि पुढे अगदी दक्षिण भारताशी जोडतो.
 
अशा मोक्याच्या जागेजवळच त्या काळात ब्रिटिशांच्या हवाई दलाचा, रॉयल एअर फोर्सचा तळ होता. नेवळी गावात तर एक धावपट्टी आजही आहे.पण सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात हा भाग सामान्यांसाठी अगदी दुर्गम होता.
"तेव्हा इथे साध्या साध्या सुविधाही नव्हत्या. वीज, पाणीपुरवठा सोडाच, पण साधे रस्तेही धड नव्हते. साप, विंचूंचा सुळसुळाटही असायचा," असं उल्हासनगरचे माजी महापौर हरदास मखिजा सांगतात.
 
हरदास चार महिन्यांचे असताना 1948 साली त्यांचे वडील सन्मुख मखिजा सिंधमधून भारतात आले होते. सन्मुख यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, पण त्या काळातल्या सिंधच्याअनेक तरुणांप्रमाणेच त्यांनाही आपली स्वप्नं, आशा, सगळं काही सोडून द्यावं लागलं होतं.
आज जवळपास 73 वर्षानंतर हरदास फोनवरून बोलताना आम्हाला आपल्या वडिलांच्या आणि कल्याण कँपमधल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींमध्ये रमून जातात.
 
"लोक आधी लष्कराच्या बराकमध्ये राहायचे. तिथे काही खोल्या वगैरे नव्हत्या. मग अनेकदा कपड्याचं किंवा कसलंसं पार्टिशन टाकून लोक राहायचे. सरकारनं रेशनवर धान्य दिलं होतं, पण कँपमध्ये चक्कीही नव्हती. त्यामुळे गहू दळून आणायचे तर कल्याणला जावं लागायचं."
 
तशा विपरीत परिस्थितीत सिंधहून आलेले निर्वासित इथे राहिले, जगायला शिकले. त्यांची संख्या वाढत 90 हजार ते 1 लाखापर्यंत गेली होती. मग याच कॅम्पमध्ये नव्या शहराची स्थापना करून निर्वासितांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
 
8 ऑगस्ट 1949च्या दिवशी गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी नव्या शहराची कोनशिला रचली. उल्हास नदीवरून शहराला नाव मिळालं 'उल्हासनगर'.
 
सिंधू नदीच्या काठचे, प्राचीन सिंधू संस्कृतीचा वारसे सांगणारे लोक मग उल्हास नदीच्या काठावर नव्यानं आयुष्य उभारू लागले.
भारतातलं मिनी सिंध
1947 सालच्या फाळणीनं पंजाब आणि बंगालची विभागणी केली होती. पण फाळणीनं सिंध अख्खंच पाकिस्तानात गेलं होतं. त्यामुळे सिंधी लोकांना स्वतंत्र भारतात आपली म्हणावी अशी जमीन राहिली नव्हती. साहजिकच भाषावार प्रांतरचनेत सिंधी भाषकांच्या वेगळ्या राज्याचा प्रश्नच आला नाही.
 
पण उल्हासनगरच्या रूपानं सिंधी समाजाला स्वतःचं शहर मिळालं. इथे त्यांनी आपली भाषाच नाही, तर आपली संस्कृतीही टिकवून ठेवली.
 
उल्हासनगरचे सिंधी लोक प्रामुख्यानं हिंदू धर्माचं पालन करतात, वरुणाचा अवतार असलेल्या (पाण्याचा देव) झुलेलाल यांची पूजा करतात. चालिहो साहिब, तिजरी, चेनी चांद असे सिंधी सण, उत्सव उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहानं साजरे होतात. अनेकजण शीख धर्माचं पालन करतात. त्याचं प्रतिबिंब उल्हासनगरच्या गुरुद्वारांमध्ये दिसतं.
 
इथल्या खास सिंधी पदार्थांची चव चाखण्यासाठी तर आजकाल बाहेरूनही खवय्ये उल्हासनगरला भेट देतात. दाल पकवान, दाल सँडविच, छोले पॅटिस, बटनपापडीवर ताव मारतात.
 
प्रसिद्ध यूट्यूबर आशिष चंचलानी सांगतो, "इथला आमचा वारसा माझ्यासाठी मूल्यवान आहे. सिंधी फूडची तर सध्या पुन्हा चर्चा होते आहे, अनेकजण या सिंधी खाद्यसंस्कृतीचं कौतुक करतात."
 
सीएचएम कॉलेज, आरकेटी कॉलेजसारख्या शिक्षणसंस्था इथे उभ्या राहिल्या आणि अगदी कर्जत-खोपोलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाचं दार उघडलं.
 
एखादं रोप उपटून काढून कुणी दुसरीकडे दूर भिरकावल्यावरही तिथे आपली मुळं रोवतं, तसं सिंधी समुदाय उल्हासनगरमध्ये रुजला आहे. पण सिंधहून आलेले सगळेच निर्वासित सिंधी नव्हते.
 
सिंधचे मराठी निर्वासित
महाराष्ट्रात मराठी निर्वासित राहतात असं सांगितलं तर? तुमचा विश्वास बसणार नसेल, तर उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारला भेट द्या. हा भाग आजही मराठा सेक्शन म्हणूनच ओळखला जातो.
 
ब्रिटिश राजवटीत सिंध हा एकेकाळी बॉम्बे प्रेसिडंसी म्हणजे मुंबई प्रांताचा भाग होता. कराचीतली हाकी महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत होती.
 
त्यामुळे सिंधी आणि मराठी लोकांमधली देवाणघेवाण वाढत गेली आणि अनेक मराठी भाषिक लोक नोकरी व्यवसायासाठी कराचीला स्थायिक झाले. त्यात कोकण आणि गोव्यातून गेलेल्या मराठी लोकांची संख्या मोठी होती.
 
उल्हासनगरचे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक दिलीप मालवणकर यांचे वडील त्यापैकीच एक होते. मालवणकर सांगतात, "माझे वडील आणि काका कराचीत पोर्ट ट्रस्टमध्ये काम करायचे. फाळणीनंतर त्यांना इथे यावं लागलं. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलं आणि उल्हासनगर त्यांचं नवं घर बनलं."
फाळणीनंतर सिंधहून आलेल्या मराठीजनांनी महाराष्ट्रातही आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली. त्यांच्या 'सिंध महाराष्ट्रीय समाज' आणि 'श्री कालिका कला मंडळ' या संस्था इथे आजही कार्यरत आहेत.
 
सिंध महाराष्ट्रीय समाजानं उल्हास विद्यालय या मराठी शाळेची स्थापना केली आणि उल्हासनगरात गणेशोत्सवाचीही सुरुवात केली होती.
 
उल्हासनगरातला सिंधी-मराठी संघर्ष
निर्वासित म्हणून सगळे एकाच संकटातून जात होते. पण म्हणून सगळे एकत्र गुण्यागोविंदानं राहात होते, असं मात्र नव्हतं.
 
महाराष्ट्रात परतलेले मराठी आणि नवीन प्रांतात आपली भाषा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे सिंधी यांच्यात संघर्ष झाले नसते, तरच नवल.
 
काहीवेळा तर दंगली आणि संचारबंदीपर्यंत परिस्थिती पोहोचली होती, असं जुने रहिवासी सांगतात.
 
उल्हासनगरच्या स्थापनेच्या वेळेपासूनच हा संघर्ष सुरू झाला. सिंधी भाषकांनी तेव्हा शहराचं नाव सिंधुनगर करावं अशी मागणी केल्याचं आणि त्यावरून भांडणं झाल्याची आठवण हरदास माखिजा सांगतात.
 
दिलीप मालवणकर सांगतात, "इथे सिंधी लोकांचं वर्चस्व होतं. सिंधी भाषेचा वापर मोठा होता. सगळे पत्रव्यवहार सिंधीतून व्हायचे. अनेक गैरसिंधी मराठी, गुजरातींना ते पटायचं नाही आणि मग वाद व्हायचे. पण 1995 - 96 नंतर वातावरण बदललं. आता पूर्वीचा कडवटपणा राहिलेला नाही सगळे एकमेकांत मिसळून गेले आहेत."
 
उद्योगींचं उल्हासनगर
सिंधी लोक उल्हासनगरला आले, तेव्हा इतर निर्वासितांसारखेच कफल्लक होते. इथे त्यांना घर तर मिळालं, पण ते चालवायचं कसं हा प्रश्न होताच.
 
नानिक मंगलानी जुने दिवस आठवतात. "लोकांनी ट्रेनमध्ये काहीबाही विकून आपलं घर चालवलं. पडेल ते काम केलं, अगदी हमालीही केली. दुकानांत, कारखान्यांत मिळेल ती नोकरी करू लागले. माहौल असा होता की, आधी पोट भरायचं आहे एवढंच लक्ष्य होतं."
लोकांनी अगदी लोणची, पापड बनवणं असे उद्योग सुरू केले. घराघरात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, लाची, लॉलीपॉप बनवले जायचे. मुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आणि काही ठिकाणी दारोदार फिरून हे पदार्थ विकले जायचे.
 
सिंधी लोक नव्या व्यवसायांत उतरले आणि एक एक बाजार तयार होत गेले. फर्निचर बाजार, कपड्यांचं गजानंद मार्केट, जपानी मार्केट असं उल्हासनगर वाढत गेलं. नायलॉन, प्लॅस्टिकच्या पदार्थांची निर्मिती, जीन्सची निर्मिती याबाबतीत उल्हासनगर हे देशातल्या प्रमुख शहरांपैकी एक बनलं. सेंचुरी रेयॉनसारख्या कंपन्याही या परिसरात आहेत.
उल्हासनगरचे सिंधी लोक उद्योग व्यवसायात यशस्वी कसे झाले, याची कहाणी म्हणजे अर्थशास्त्रातला अभ्यासाचा विषय ठरावा. सीएचएम कॉलेजच्या प्राचार्य मंजू लालवानी पाठक यांनी त्यावर संशोधनही केलं आहे.
 
त्या सांगतात, "सिंधी लोक आधीपासूनच स्थलांतर करत आले आहेत. स्थलांतर करणारे लोक आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, पुन्हा पाय रोवण्यासाठी नेहमी आक्रमक आणि प्रगतशील असतात. सिंधी समाजाचाही त्याला अपवाद नाही."
 
सिंधी लोकांची व्यवसाय करण्याची एक पद्धत असल्याचं त्या नमूद करतात. "सिंधी लोक ग्राहकाला देवासमान मानतात. धंदा करताना profit maximization पेक्षा ते sales maximization वर भर देतात. म्हणजेच नफा मिळवणं हा त्यांचा उद्देश नसतो, तर जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करण्याला ते प्राधान्य देतात."
 
मंजू पुढे उदाहरणच देतात. "ब्रँडेड शर्ट विकणारे एक शर्ट विकतात आणि चार गिऱ्हाईकांना नाही सांगतात. पण उल्हासनगरच्या कॅम्प टू मार्केटमधले लोक एखाद्याची परिस्थिती बघून त्याला किंमत सांगतात आणि जास्तीत जास्त वस्तू विकून नफा कमावतात."
'ड्युप्लिकेट कॅपिटल'
याच उद्योगी वृत्तीतून उल्हासनगरमध्ये एक मोठी कॉटेज इंडस्ट्री उभी राहिली होती आणि अगदी पार कर्जत खोपोलीपर्यंतच्या लोकांना त्यातून रोजगार मिळाला. पण यातूनच उल्हासनगर बनावट वस्तूंसाठी बदनामही झालं.
 
इतकं की, काहींनी तेव्हा उल्हासनगरला भारताची 'ड्युप्लिकेट मालाची कॅपिटल' म्हटलं होतं. मुंबई परिसरातल्या बोलीभाषेत उल्हासनगरी हा शब्द बनावटसाठी समानार्थी म्हणून वापरला जाऊ लागला.
 
उल्हासनगरमध्ये निर्मिती करणाऱ्या लोकांना सुरुवातीला वेगळं ब्रँडिंग परवडणारं नव्हतं. मग 'पार्ले'चं 'परेल', 'भारत'चं 'भरत'अशी नावाची कॉपी केली जायची. 'Made in USA' म्हणजे मेड इन उल्हासनगर सिंधी असोसिएशन, अशी ओळख बनली.
मखिजा सांगतात, "70-80 च्या दशकांत भारतात आजच्यासारख्या चायनीज वस्तूंचा पुरवठा नव्हता आणि लोकांना स्वस्तातले पर्याय हवे होते. साहजिकच उल्हासनगरच्या स्वस्त मालाला मागणी असायची."
 
उद्योग स्थिरावल्यावर अनेकांनी आता स्वतःचे ब्रँड्स तयार केले आणि काहीजण मोठ्या कंपन्यांना माल पुरवू लागले. स्कूटरच्या स्पेअर पार्ट्ससारख्या 'जेन्युईन फेक'गोष्टी इथे मिळू लागल्या. जेन्युईन फेक म्हणजे फर्स्ट कॉपी अर्थात ब्रँडेड कंपन्यांसाठी वस्तू तयार करणाऱ्या निर्मात्यांनीच विनापरवाना तयार केलेल्या वस्तू.
 
पण एकीकडे उद्योगधंदे विस्तारत असताना बेकायदेशीर व्यवसायही आलेच. उल्हासनगर अस्ताव्यस्त पसरत गेलं. इथे समस्यांचे डोंगर उभे राहू लागले, बकालपणाही आला आणि गुन्हेगारीही वाढत गेली.
 
पप्पू कलानी आणि गुंडगिरी
1990 साली रिंकू पाटील या सोळा वर्षाच्या मुलीला एकतर्फी प्रेमातून भर दिवसा पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आलं होतं. दहावीच्या परीक्षा केंद्रावरच घडलेल्या त्या प्रसंगानं महाराष्ट्र हादरला होता.
 
पण त्याआधीच्या दशकभरापासून उल्हासनगरात संघटित गुन्हेगारी, खंडणी, माऱ्यामाऱ्या, हत्या अशा घटना वाढत होत्या. इथे गोपाल राजवानी, पप्पू कलानी अशा वेगवेगळ्या गँग कशा तयार होत गेल्या, याविषयी ठाणे पोलीसांत काम केलेले एक माजी अधिकारी माहिती देतात.
 
"मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी उल्हासनगरातल्या गँग्स जोडल्या गेल्या होत्या. राजवानी आणि कलानी गँगमध्ये खंडणीवरून वाद झाले तेव्हा पाच महिन्यांत 10-15 लोकांचे खून झाले. तेव्हा चर्चा असायची की दर मंगळवारी हत्या घडत असत. पप्पू कलानीची दहशत पसरली होती पण त्याला पाठिंबाही मोठा होता."
 
पप्पू अर्थात सुरेश कलानींचा जन्म उल्हासनगरातल्या धनिक कुटुंबात झाला होता. त्यांचं कुटुंब हॉटेल आणि डिस्टिलरी व्यवसायात होते. काका दुलीचंद कलानींच्या मागोमाग सुरेश कलानींचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पप्पू कलानी 1986 मध्ये अवघ्या 35व्या वर्षी नगराध्यक्ष बनला आणि त्याच वर्षी आमदारकीही मिळाली, अशी माहिती स्थानिक पत्रकार देतात.
 
सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची हकालपट्टी केली, तेव्हा पप्पूला काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं.
 
टाडा कायद्याअंतर्गत तो पुढे जेलमध्ये गेला. पण दबदबा एवढा होता, की त्यानं जेलमधूनही निवडणुका जिंकल्या. कधी राष्ट्रवादी, कधी आरपीआयची साथ घेत, कधी पत्नी ज्योती कलानीच्या मार्फत त्यानं राजकारण सुरू ठेवलं. आजही कलानी कुटुंबाचा प्रभाव इथे दिसून येतो. आता गँगवॉर्स होत नाहीत, पण गुन्हेगारी पूर्णपणे संपलेली नाही.
 
समस्यांचं शहर
निर्वासितांच्या छावणीचं आता महानगर बनलंय. शहरात उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड अशी तीन रेल्वे स्टेशन्स आहेत. म्हटलं तर अनेक सोयीसुविधा आहेत, प्रदूषण आणि अनधिकृत बांधकामं अशा समस्यांचा पाढाही मोठा आहे.
 
मुंबईहून अंबरनाथकडे लोकल ट्रेननं जाताना उल्हासनगर स्टेशनला उतरलात की समोरच वालधुनी नदी दिसते. एकेकाळी हे पाणी लोक पिण्यासाठीही वापरायचे. पण घरं आणि रासायनिक सांडपाणी यांमुळे नदीचं नाल्यात रुपांतर झालं. इथला पायपूल पार करताना अनेकांना नाकावर हात ठेवूनच जावं लागतं.
 
शहरातल्या चिंचोळ्या गल्लीबोळांची कथाही वेगळी नाही. नवखे असाल, तर तिथं चालताना कधी कधी शहर अंगावर येतं.
उल्हासनगरची स्थापना झाली, तेव्हा इथे लाखभर निर्वासितांची लोकवस्ती होती. दूरदूरपर्यंत साध्या सुविधा नव्ह्या. पण साधारण 13.4 चौरस किलोमीटरच्या शहरात आता सात-आठ लाख लोक राहतात. निर्वासितांबरोबरच स्थलांतरीतांचीही शहरात भर पडली आहे.
 
दिलीप मालवणकर सांगतात, "शहर वाढू शकत नाही, तेव्हा आहे त्या जागेत मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. राजकीय आश्रय असल्यानं अनधिकृत बांधकामं होत गेली. इथली परिस्थिती बदलण्याचा कोणी फार विचारही करत नाही. यापुढे अनधिकृत बांधकामं होऊ न देणं एवढंच हातात आहे."
 
नवी पिढी आणि रिव्हर्स मायग्रेशन
उल्हासनगर बदलतंय, तशी निर्वासितांचं शहर ही ओळख बदलते आहे. या सगळ्यातच इथे सिंधी भाषा आणि पर्यायानं संस्कृती मागे पडत असल्याची खंत तिथले बुजुर्ग व्यक्त करतात.
 
इंग्रजी माध्यमातलं शिक्षण आणि हिंदीचा वापर यांमुळे नव्या पिढीत अनेकांना सिंधी धड वाचता येत नाही. पण सिंधी वारसा टिकवायचा असेल तर तरुणांनी प्रयत्न करायला करायला हवेत असं हरदास मखिजा सांगतात.
 
यूट्यूबर आशिष चंचलानीही हे मान्य करतो. त्या म्हणतो, "डिजिटल युगातल्या आजच्या पिढीकडे परंपरा, संस्कृती, वारसा किंवा आपली मागची पिढी कुठून आली याचा विचार करायलाही वेळ नसतो. मला वाटतं तरुणांनी आपल्या आजीआजोबांसोबत वेळ घालवायला हवा आणि या गोष्टींविषयी बोलायला हवं. तरंच आम्ही हे सगळं आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू."
 
आशिष स्वतः तसे प्रयत्न करतो आहे. नव्या पिढीतले अनेकजण शहराबाहेर पडत आहेत. इथल्या सिंधी तरुणांमध्ये काहींना उल्हासनगरची ओळख नकोशी वाटते.
 
पण आशिषसारख्या अनेकांसाठी मात्र उल्हासनगर हेच त्यांचं गाव आहे. तो सांगतो, "उल्हासनगर हेच माझं घर आहे. ही जागा कायम माझ्या हृदयात राहील, कारण मी जे काही आहे, ते उल्हासनगरमुळेच आहे."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती