मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे धैर्य दाखवत आज खुद्द बीकेसी कोविड सेंटरमध्ये पीपीई किटसह उतरल्या. त्याठिकाणी रूग्ण, डॉक्टरांशी संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांमध्ये जनजागृती करणे आमचे काम आहे, तसेच ग्राऊंड रिअॅलिटी पाहणेही आमचे काम आहे. आज बीकेसी येथे ज्या पद्धतीने ग्राऊंड रिअॅलिटी तपासली तशीच रिअॅलिटी संपूर्ण मुंबईभर तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. नर्सेस आणि डॉक्टरांना या ओमिक्रॉनच्या नव्या संकटात लढण्यासाठी आम्ही मोटिव्हेशन देत आहोत. होय तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत हेच आवाहन मुंबईची महापौर म्हणून केले आहे. त्यावेळी प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये रूग्णांना, डॉक्टरांना आणि नर्सेसना भेटून रूग्णांचे मनोबल वाढवल्याचेही त्यांनी सांगितले. मी पहिल्या दिवसापासून घाबरवले नाही. मुंबईकरांनी घाबरू नका, पण काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी केले.
बाळासाहेबांची आम्हाला धाडसाची शिकवण आहे. त्यामुळे रिअॅलिटी चेक करताना मुंबईकरांसाठी कोरोनाचा संसर्ग झाला आणि संसर्गाने मृत्यू जरी झाला तरीही मी मृत्यूला घाबरत नाही. आम्ही कधीही मुंबईकरांना घाबरवण्याचे काम केले नाही. त्यामुळे आम्ही जे धाडस दाखवतो आहोत तसेच धाडस विरोधकांनीही दाखवावे असेही आवाहन त्यांनी केले. विरोधकांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकांना मृत्यूच्या दारात टाकू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.