भाजप नेते किरीट सोमय्या यांची अडवणूक केल्याप्रकरणी सोमय्यांनी पोलिसांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच येत्या २४ तासांच्या आता मुलुंडसह मुंबई पोलिसांनी माफी मागावी, अशी देखील त्यांनी मागणी केली. नवघर मुलुंड पूर्व येथील पोलीस ठाण्यात सोमय्यांनी ही पोलिसांविरोधातील तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर एसपी यांना सोमय्यांनी पुन्हा पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, २० सप्टेंबर रोजी स्थगित झालेला कार्यक्रम मंगळवारी आणि बुधवारी, मंगळवारी सकाळी ९ वाजता आई आंबाबाईचं दर्शन घेऊन हा कार्यक्रम करणार आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मला इतके का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानंतर हे काय करणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यानंतर जाऊ दिलं. त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी करत मला आडवले, म्हणून याप्रकरणी आधिकृत तक्रार करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आलो आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.