ईडीच धाडसत्र : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निगडीत ७ ठिकाणी धाडसत्र

गुरूवार, 26 मे 2022 (14:52 IST)
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील अनेक राजकीय नेते, मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निगडीत तब्बल ७ मालमत्तांवर आज सकाळपासूनच ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. परब यांच्या शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील निवासस्थानी आणि पुणे व दापोलीच्या मालमत्तांचा त्यात समावेश आहे.  ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ईडीचे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते, असे सांगण्यात येते. वांद्रे येथील परब यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षकही उपस्थित आहेत. मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
 
विभास साठे यांच्याकडूनच दापोलीत अनिल परबांनी रिसॉर्ट खरेदी केला होता. याच रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जाते. पुण्यात विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील पलेडियम इमारतीत साठे यांचे घर आहे.
 
100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जाते.  सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही परब यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या हेच राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमागे हात धुवून लागल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.
 
अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती