Antibiotic Reaction Death ताप आल्यावर मुंबईत डॉक्टरने स्वतः अँटिबायोटिक सलाईन लावले, रिॲक्शनमुळे मृत्यू झाला

बुधवार, 6 मार्च 2024 (13:01 IST)
मुंबईत अँटिबायोटिक रिएक्शन (Antibiotic Reaction) मुळे एका रेजिडेंट डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सायन परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक मेडिकल हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ताप आल्याने मृत डॉक्टरांनी स्वतःला अँटिबायोटिक सलाईन लावल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ धुमाळ असे मृताचे नाव असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते सायन हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरीमध्ये दुसऱ्या वर्षाचा पदव्युत्तर शिक्षण घेत होते. गुरुवारी ते वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत त्यांचा मृत्यू अँटीबायोटिक सलाईन दिल्यानंतर झालेल्या प्रतिक्रियामुळे झाल्याचे समोर आले आहे.
 
डॉ.धुमाळ गुरुवारी बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. यावेळी ते त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. बेडवरही सलाईन आढळून आले.
 
ताप आल्याने अँटिबायोटिक्स घेतली
वृत्तानुसार डॉ.धुमाळ वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. वसतिगृहातील कोणी मानसिक तणावाखाली असायचे तेव्हा त्यांचे समुपदेशन करायचे. काही दिवसांपूर्वीच ते 10 दिवसांच्या रजेवरून परतले होते. मात्र ताप आल्याने त्यांच्यावर वसतिगृहातच उपचार सुरू होते. तापामुळे त्यांनी स्वतःला अँटिबायोटिक सलाईन लावले आणि प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
साइड-इफेक्टमुळे जीव गमावला
सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. मोहन जोशी म्हणाले की, डॉ. धुमाळ हे अतिशय हुशार विद्यार्थी होते. ते इतर विद्यार्थ्यांना आधार देत असे. त्याच्या अंगावर रॅशेस आढळून आले. साधारणपणे औषधाच्या दुष्परिणामांमुळे शरीरावर पुरळ उठतात. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती