रामानंद सागर : रामायण मालिकेविषयी जाणून घ्या 'या' 5 रंजक गोष्टी

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:45 IST)
1987 ते 1988 या काळात दूरदर्शनवर रामायण या मालिकेचं प्रसारण झालं. अरुण गोविल (श्रीराम), दीपिका चिखलिया (सीता), दारा सिंग (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या.
 
भारताच्या टीव्ही इतिहासातली सगळ्यात यशस्वी मालिका म्हणून ‘रामायण’ कडे पाहता येईल. 78 भागांमध्ये चाललेली ही मालिका दर रविवारी सकाळी प्रसारित व्हायची. यातले काही लोकप्रिय भाग जवळपास 8 कोटी ते 10 कोटी लोकांनी पाहिले होते. हा आकडा भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या एक अष्टमांश इतका होता.
 
रामायणाचं एकूणच भारतीय समाजातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. पण त्या काळात याची लोकांमध्ये क्रेझ किती होती हे न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीत मीडिया स्टडीजचे प्राध्यापक असलेले अरविंद राजगोपाल सांगतात. ते म्हणतात “रेल्वे गाड्या स्टेशनमध्ये थांबायच्या, बसेस थांबायच्या आणि प्रवासी उतरून रस्त्यालगत मिळेल तिथे टीव्ही गाठून रामायण पाहायचे. ही गर्दी इतकी मोठी असायची की अनेकांना तो टीव्ही दिसायचाही नाही, ना काही ऐकू यायचं. पण मुख्य मुद्दा तिथे असणं हा होता. तो अनुभव त्यांना महत्त्वाचा होता.”
 
स्क्रीनची पूजा
 
बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी 2011 मध्ये आपल्या एका लेखात रामायण मालिकेबद्दलची एक आठवण लिहिली होती.
 
“1980 च्या दशकात रविवारी सकाळी रामायण सुरू झालं की जवळपास संपूर्ण देश बंद होत असे. रस्त्यांवर सामसूम व्हायची,दुकानं बंद व्हायची आणि लोक आंघोळ करून, टीव्हीला हार घालून मग ही मालिका पाहायला बसायचे.”
मिलेनियल्सनी त्यांच्या आजी-आजोबांना विचारलं, तर त्यांना ही गोष्ट सहज ऐकायला मिळेल, “रामायण सुरू होण्यापूर्वी आम्ही स्वच्छ आंघोळ करून, उदबत्ती लावून, पूजा करून, फरशीवर बसायचो. बायका डोक्यावर पदर घ्यायच्या आणि सगळं कुटुंब भक्तीभावाने रामायण पाहायचं”
 
बीबीसीसाठी 2019 मध्ये लिहीलेल्या एका लेखात राहुल वर्मा यांनी म्हटलं होतं की रामायण मालिकेने हिंदू धर्मीयांसाठी मंदिरातल्या दर्शनाचा अनुभव घरात आणला. मंदिरात राम-सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचं दर्शन घेण्याचा अनुभव आता घरोघरी टीव्ही स्क्रीनवर मिळत होता.
 
रामाची भूमिका वठवणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही याबद्दल म्हटलं होतं, “लोकांसाठी हा अनुभव मंदिरात जाण्यापेक्षा कमी नव्हता. लोक आंघोळ, पूजा करून टीव्हीसमोर बसायचे, टीव्हीला माळा घालायचे, गंध लावायचे, हळद-कुंकू वाहायचे. या शोबद्दल त्यांना खूप आस्था होती.”
या मालिकेने अरुण गोविल यांचं आयुष्य बदलून गेलं. “मी कुठेही गेलो तरी लोक माझ्या पाया पडायचे, मला स्पर्श करू पाहायचे. त्यांना माझ्याबद्दल प्रचंड कौतुक आणि आदर होता, त्यांना मला पाहिल्यानंतर आनंदाने रडू कोसळायचं. माझ्याकडे एक कात्रण आहे. मी जेव्हा रामाच्या वेशात वाराणसीला गेलो होतो तेव्हा एका वर्तमानपत्रात ती बातमी होती ‘रामाला पाहण्यासाठी दहा लाख लोक जमले’.” गोविल आपल्या आठवणी जागवतात.
 
‘रामायण ज्वर’
 
सगळ्या देशाला ‘रामायण ज्वर’ चढला होता. ही मालिका संपल्यानंतर एका आठवड्याने, 7 ऑगस्ट 1988 रोजी पत्रकार शैलजा वाजपेयी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लेख लिहीला होता. “यासारखी मालिका यापूर्वी झाली नाही आणि कदाचित पुन्हा होणारही नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून गोरखपूरपर्यंत, लाखो लोकांनी उभ्याने, बसून किंवा उकिडवं होऊन ही मालिका पाहिलीय. अगदी धक्काबुक्की करत, गर्दीत उभं राहून लाखोंनी ही मालिका पाहिली असेल.
‘रामायण’ मालिकेचा तत्कालीन राजकारणाशीही जवळचा संबंध आहे. देशभरात 80च्या दशकात देशभरात पसरू लागलेल्या हिंदुत्वाच्या लाटेला बळ देण्याचं काम या मालिकेने केलं असं म्हटलं जातं. ‘रामायण’ सुरू होईपर्यंत टीव्हीवर अगदी मोजकेच धार्मिक कार्यक्रम दाखवले जात असत कारण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.
 
प्राध्यापक अरविंद राजगोपाल सांगतात, “रामायण टीव्हीवर येणं हा भारताच्या धर्मनिरपेक्ष सामाजिक संवादातला निर्णायक क्षण होता. धार्मिक आणि रुढीवादी समाज याचं प्रमुख लक्ष्य होता. जनमानसातून या मालिकेला मिळणारा प्रतिसाद हा भक्तीभावाचा होता, पण त्याचं रुपांतर एका राजकीय शक्तीत करण्यात राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची होती.”
 
2000 साली फ्रंटलाईन मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत प्राध्यापक राजगोपाल यांनी म्हटलं होतं की तत्कालीन सरकारने जेव्हा 'रामायण'चं दूरदर्शनवरून प्रसारण सुरू करणं हा धार्मिक पक्षपात न करण्याच्या अनेक दशकं चाचलेल्या परंपरेला तडा होता. हिंदू राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.”
“याचा परिपाक म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातली सर्वांत मोठी चळवळ सुरू झाली आणि याने भारताच्या राजकारणाचा पोत बदलून टाकला. एका धार्मिक महाकाव्याचं प्रसारण आणि त्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाने भारतात हिंदू जागृतीची आणि देश एकत्र येत असल्याच्या भावनेवर शिक्कामोर्तब केलं.”
 
यातला रंजक भाग असा की रामायण टीव्हीवर आणण्यात काँग्रेस सरकारचा हात होता. याद्वारे हिंदू मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा मानस होता, पण याचा सगळ्यात जात फायदा झाला तो म्हणजे हिंदुत्ववादाचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला.
 
राम जन्मभूमी अध्याय
 
टीव्हीवर रामायण सुरू झाल्यानंतर आणि ते संपल्यानंतर देखिल, संघ परिवाराने या हिंदू जागृतीच्या लाटेचा फायदा करून घेत समस्त हिंदू समाजाला एकत्र आणण्याची हिंदू राष्ट्रवादाला बळकटी देण्यासाठी धडपड केला. ‘रामराज्य’ या संकल्पनेला या काळात बळ मिळालं. याच काळात अयोध्येत बाबरी मशिद-राम जन्मभूमीचा वादही पेटायला लागला होता.
 
या सगळ्यात जन्म झाला राम जन्मभूमी चळवळीचा. टीव्हीवर पाहिलेल्या राम-लक्ष्मणासारखी वेशभूषा करत आणि ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत कार्यकर्ते एकत्र येत होते. राम मंदिरासाठी विटा आणि देणग्या गोळा करण्याच्या मोहिमांमधून देशभरातला हिंदू समाज एकवटला जात होता.
 
प्राध्यापक राजगोपाल म्हणतात की रामायण मालिकेतही याचे पडसाद दिसत होते. “एका भागात प्रभू राम असं सांगतात की ते आपल्या जन्मस्थानावरून संपूर्ण पृथ्वीचं निर्वहन करत होते. माझ्या माहितीतल्या कुठल्याही रामायणात असा उल्लेख नाहीय. हे त्या काळच्या राम जन्मभूमी आंदोलनाचं प्रतिबिंब होतं. ही मालिका आणि तेव्हाचं राजकारण एकमेकांचं प्रतिबिंब दाखवत होते हेच यातून दिसून येतं.”
 
डिसेंबर 1992 मध्ये हिंदुत्त्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या यात्रेत जवळपास दीड लाख लोक सहभागी झाले आणि ते अयोध्येकडे चालून गेले. यातल्याच काहींनी 16 व्या शतकात उभारलेली बाबरी मशीद पाडली आणि यानंतर देशभरात याचे हिंसक पडसाद उमटले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अखेर निकाल दिला आणि आता केंद्र सरकारने राम जन्मभूमी न्यास स्थापन करत अनेक वर्ष वादग्रस्त राहिलेल्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे.
या मालिकेतून आलेल्या संज्ञा आणि प्रतीकं लोकांच्या मनात आणि सामाजिक संवादात रुळली आहेत. ‘रामराज्य’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय झाली ती याच मालिकेनंतर आणि पंतप्रधान मोदी आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांना अनेकदा भाजपचे राम आणि लक्ष्मण म्हटलं जातं.
 
हा रामायण मालिकेचा परिणाम आहे असं नाही, पण या मालिकेमुळे लोकांना हिंदू प्रतीकांचा एक तयार संच मिळाला. भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची हिंदुत्ववादी परिभाषा लिहिण्यातही यांची मदत झाली.
 
“हिंदू राष्ट्रवाद्यांना बराच काळापासून एका प्रखर हिंदू समाजाची निर्माण करण्याची इच्छा आहे. एकेका माणसाचं व्यक्तिमत्व घडवतंच तुम्ही समाजाचं असं व्यक्तिमत्व घडवू शकता.” प्राध्यापक राजगोपाल विश्लेषण करतात. “अनेक वर्षं असा समज होता की हे काम तळागाळातून सुरू करावं लागेल. पण मीडिया आणि टीव्ही आल्यामुळे हे काम खालून वर नाही तर वरून खाली या पद्धतीने करता आलं. प्रतीकांच्या मदतीने.”
 
आधुनिक पुराण
 
2018 मध्ये हिंदुस्तान टाईम्स मध्ये रामायण मालिकेने भारतावर टाकलेल्या प्रभावाची मिमांसा करणारा एक लेख होता. यात लिहीलं होतं, “रामानंद सागर यांचं रामायण हे संघ परिवार आणि भाजपच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या भारतातल्या हिंदू राष्ट्रवादाच्या पार्श्वभूमीवर घडत होतं. राजकीय आणि सांस्कृतिक भाष्यकार या मालिकेची वर्गवारी कशी करायची याबद्दल संभ्रमात होते पण काहींनी या मालिकेची गणना देशात तेव्हा सुरू असलेल्या चळवळीने जी उलथापालथ घडवून आणली तिला चालना देणारा किण्वक म्हणून केली होती.”
 
या मालिकेचा प्रभाव प्रतीकात्मकतेच्या पलिकडे जाणारा होता. हिंदुस्तान टाईम्सच्या लेखात लिहिलं होतं, “या मालिकेचा राजकीय प्रभाव किती होता याचा अंदाज या गोष्टीतून येईल की अरुण गोविल आणि रामानंद सागर या दोघांनाही काँग्रेस आणि भाजपने वारंवार आपल्या निवडणूक प्रचारात ओढण्याचा प्रयत्न केला होता. दीपिका चिखलिया (सीता) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) हे दोघे तर पुढे जाऊन खासदार झाले.”
जगातली सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका’ असं वर्णन रामायणच्या निर्मात्यांनी केलं होतं. भारत तेव्हा 1990 च्या नव्या उदारीकरणाच्या उंबरठ्यावर होता आणि या मालिकेने हे दाखवून दिलं की हिंदु धर्म हा आधुनिकतेच्या, तसंच नव्या युगाच्या तांत्रिक आणि ग्राहकाभिमुख बदलांच्या पावलार पाऊल टाकत पुढे सरकत होता.
 
ही मालिका संपल्याला वर्षं उलटून गेली तरी अरुण गोविल यांच्या जीवनावरचा तिचा प्रभाव ओसरलेला नाही. “एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी ते यश हानिकारकच ठरलं, कारण मला दुसऱ्या कुठल्याच भूमिका मिळाल्या नाहीत. लोक मला म्हणायचे ‘तुम्ही राम म्हणून लोकांच्या मनात ठसलाय’. सुरुवातीला मला याचा त्रास व्हायचा. पण शेवटी तुम्ही याकडे कसं पाहता ते ही महत्त्वाचं आहे. लोक आजही माझ्या त्या भूमिकेसाठी मला लक्षात ठेवतात, माझा आदर करतात आणि माझ्यावर प्रेम करतात.”
 
गोविल यांनी नंतर नाटकांमध्येही रामाची भूमिका केली आणि त्यांच्याप्रमाणेच भारतावरही रामायणाचा प्रभाव टिकून राहिला.
 
(राहुल वर्मा यांच्या ‘The TV Show That Transformed Hinduism’ या लेखातील इनपुट्स सह)
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती