मुंबईतील पश्चिम उपनगरासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रवास करत मुंबईतकांच्या सेवेत ही मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मेट्रो ७ मार्गावर आरे ते कुरार असा प्रवास केला. मेट्रोच्या २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईकरांसाठी पश्चिम उपनगरात या मेट्रोच्या २ अ आणि मेट्रो मार्ग ७ च्या फेऱ्यांमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा अंदाज एमएमआरडीएने बांधला आहे. तसेच रस्त्यांवरील वाहनांची संख्याही या मार्गांमुळे कमी होण्यासाठी मदत होईल, असा अंदाजही एमएमआरडीएने वर्तवला आहे. मेट्रोच्या २०.७३ किमीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत खुला करून देण्यात येत आहे. एकुण ११ ट्रेन या मार्गावर चालवण्यात येणार असून त्या माध्यमातून एकुण १५० फेऱ्या या मार्गावर होतील.
कसे आहे वेळापत्रक ?
मेट्रोकडून एकुण ११ ट्रेन्स या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस आहेत. तर ११ ट्रेन्सची एकुण कोचेसची संख्या ६६ इतकी आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. साधारण ११ मिनिटांनी एक ट्रेन अशा मेट्रोच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनची प्रवासी क्षमता ही २२८० प्रवासी प्रति ट्रेन इतकी आहे. तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार आहे. ताशी ७० किमी वेगाने या ऑपरेट करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी मिळाली आहे. तर यापुढच्या काळात ताशी ८० किमी वेगाने ट्रेन ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळू शकते अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली आहे. आगामी काळात मेट्रोच्या ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.