या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार.
मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा भवन चर्नी रोड मरीन ड्राइव्ह समोर समुद्र किनारी उभारले जाणार असून या भवनाच्या पूर्वेला सावित्री देवी फुले महिला वसती गृह तर पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर तर रुंदी 32 मीटर असेल. हे भवन सात मजली असून त्यात तळघर देखील असेल. या तळघराची लांबी 39 मीटर आणि रुंदी 22 मीटर असेल.
मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्राच्या बांधणीचा निर्णय दक्षिण मुंबई आणि त्याचे उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या भाषा भवन आणि उपकेंद्राच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे. त्यांच्या कडून हे बांधकाम होणार आहे. मुंबईचे पी.के.दास अँड असोसिएट बिल्डर या भवनाचे बांधकाम करणार आहे.
या मराठी भवनासाठी 126 कोटी रुपयांचा खर्च होणार असून 2100 चौ.मी. क्षेत्र देण्यात आले आहे. या भवनाच्या पहिल्या मजल्यावर खुले असे सार्वजनिक मंच उभारले जाणार. जेणे करून या ठिकाणी मारिन ड्राइव्ह पासून मंचा पर्यंत लोकांना थेट प्रवेश करता येण्यासाठी पायऱ्या असतील. दुसऱ्या प्रवेश दारातून जिना आणि लिफ्ट मधून प्रवेश करता येईल. या भवनात 200 आसन क्षमतेचे मोठे सभागृह, 145 आसनी क्षमतेचे अँफी थियेटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एका मजल्यावर प्रशासकीय आणि कार्यालयासाठी जागा असेल.
चार मजल्यावरील प्रदर्शन दर्शिकेला चार भागात विभागले असून त्यात विशेष तयार केलेले चलचित्रपट होलोग्राम्स, छायाचित्रांचे प्रत असतील. या दर्शिकेतील तीन मजल्यावर तांब्याच्या धातूने तयार केलेल्या जाळ्या बसवल्या जाणार. विशेष म्हणजे या जाळ्या खास मराठी लिपींच्या अक्षरांच्या रचनेतून तयार करण्यात येणार आहे.