मुंबईत आता गरज पडल्यास रुग्णाला घरपोच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रयत्न करत आहे. याबाबत अद्याप राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये चर्चा सुरु असून अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. या निर्णयावर सकारात्मक चर्चा झाल्यास मुंबईतील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा मिळणार आहे.
सद्यस्थितीत महिंद्रा समूहाने ऑक्सिजन उत्पादकांसह चर्चा करत ऑक्सिजनची अत्यंत गरज असणाऱ्या रूग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना ऑक्सिजन साठा पोहचवण्यासाठी ऑक्सिजन ऑन व्हील्स ही विनामूल्य वाहतूक सेवा सुरू केला. या उपक्रमाची सुरुवात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर येथे करण्यात आली असून यामध्ये १०० हून अधिक वाहने दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन साठा घेऊन जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार कॉर्पोरेट्स आणि अनेक मोठ्या खासगी कंपन्यांची मदत घेत आहे.
महिंद्रा ग्रुपच्या सूत्रांचा माहितीनुसार, गेल्या ४८ तासांमध्ये ऑक्सिजन ऑन व्हील्स उपक्रमाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आता थेट रुग्णाचा घरी ऑक्सिजन सिलेंडर देण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार वाढण्याचा विचार सुरु आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी वाहनांचा मोठा ताफा पालिकेचा सेवेत दाखल होणार आहे. तसेच महिंद्रा लॉजिस्टिक्स रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारी अंखडित साखळी तयार करत अनेक रुग्णालय व वैद्यकीय केंद्रांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करीत आहे.