मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेस आजपासून सुरुवात

गुरूवार, 6 मे 2021 (08:01 IST)
मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परीक्षे आजआजपासून ऑनलाईन  पद्धतीने होत आहे. ही परीक्षा २१ मे पर्यंत चालणार आहे. ही परीक्षा ४५० पेक्षा जास्त महाविद्यालये घेत असून पदवीच्या अंतिम वर्षाचे दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हि परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्व महाविद्यालये सज्ज झाली आहेत.
 
मुंबई विद्यापीठाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र ५ च्या परीक्षा डिसेंबर – जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परीक्षा मे २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार या परीक्षा होत आहेत.
 
अंतिम वर्षाच्या एकूण ४५ परीक्षा होणार
पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण ४५ परीक्षा सुरु होत आहेत.
 
बी कॉम सत्र ६ या परीक्षेत सर्वाधिक म्हणजे ६८,१०१, बीएमएसमध्ये १६,५०१, बीएमध्ये १४,५९२, बीएस्सी १०,७७०, बीकॉम अकाउंट अँड फायनान्समध्ये १०,२५१, बीएस्सी आयटीमध्ये ९७२० यासह बीएमएम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स,बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज व इतर विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षेमध्ये १ लाख ५५ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती