हडपसर येथे दीड वर्षापूर्वी झालेला खुनाचा गुन्हा उघडकीस
सोमवार, 3 मे 2021 (16:32 IST)
पुणे येथील हडपसर येथील फुरसुंगी परिसरात 29 डिसेंबर 2019 रोजी नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय 65) या व्यक्तीचा खून झाला होता. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. आरोपी संतोष सहदेव शिंदे (वय 27) याला पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फुरसुंगी परिसरातील दशक्रिया विधी करण्याच्या ठिकाणी नरसिंग गव्हाणे यांचा निर्घुण खून करण्यात आला होता. चेहऱ्यावर दगडा विटाने मारहाण करून त्यांना ठार मारण्यात आले होते. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीड वर्षापासून यातील आरोपींचा शोध लागत नव्हता.
दरम्यान सात एप्रिल रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सागर बाळू लोखंडे (वय 23) याने पत्नी शुभांगी सागर लोखंडे हिचा घरी जात असल्याच्या कारणावरून चाकूने भोसकून खून केला होता. पोलिसांनी या प्रकरणी सागर लोखंडे याला अटक केली होती.
त्याची चौकशी सुरू असताना सागर आणि शुभांगी यांचे दुसरे लग्न झाले असल्याचे त्याने सांगितले. पत्नी शुभांगी पहिला नवऱ्या सोबत बोलत असताना त्यांच्यात भांडण होत होते. एकदा शुभांगी हिने माझ्या पहिल्या नवऱ्याने यापूर्वी एक मर्डर केला आहे. जर तू आमच्या दोघांच्या मध्ये आलास तर तो तुला देखील संपून टाकेल अशी धमकी दिली होती. तपासादरम्यान सागर लोखंडे याने पोलिसांना ही माहिती.
दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दीड वर्षापूर्वी नरसिंग गव्हाणे या खून प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले नसल्याचे समजले होते. हा खून संतोष यानेच केला असावा अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच्या विषयी अधिक माहिती एकत्र करून चिखली परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पुढे केलेल्या अधिक चौकशीत त्याने खून केल्याची कबुली. ज्या ठिकाणी नरसिंग गव्हाणे हा दारू पीत असे त्याच ठिकाणी आरोपी संतोष शिंदे हा देखील दारू पिण्यासाठी जात होता.
तर संतोष शिंदे याला नरसिंग गव्हाणे याचे त्या ठिकाणी येणे आवडत नव्हते. दरम्यान 29 डिसेंबरच्या रात्री संतोष शिंदे हा दशक्रिया विधीचा ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी आधीच नरसिंग गव्हाणे बसला होता.
यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले. संतोष शिंदे याने नरसिंग याला खाली पाडून दगडाने आणि विटाने चेहऱ्यावर मारून खून केला. हडपसर पोलिसांनी अशा प्रकारे दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला या खून प्रकरणात अटक केली.