मुंबईतील धारावी येथील मशिदीमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप आहे. बेकायदा बांधकामाची माहिती मिळताच बीएमसी ते पाडण्यासाठी पोहोचले, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी मुस्लिम समाजातील लोकही मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. चर्चेनंतर बीएमसीची टीम परतली असून कारवाई तूर्तास रद्द करण्यात आली आहे. पक्षाकडून चार पाच दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. नंतर पुढील कारवाईचा विचार केला जाईल.
पोलिस अधिकारी म्हणाले, 'जी-उत्तर प्रशासकीय प्रभागातील बीएमसी अधिकाऱ्यांची एक टीम 90 फूट रोडवर असलेल्या मेहबूब-ए-सुभानी मशिदीचा कथित बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी सकाळी 9 वाजता पोहोचली. काही वेळातच, मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मशीद असलेल्या रस्त्यावर जाण्यापासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रोखले.' या अधिकाऱ्याने सांगितले की, 'नंतर शेकडो लोक धारावी पोलिस स्टेशनच्या बाहेरही जमले आणि महापालिकेच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर बसले.'
बीएमसीने कारवाई थांबवली असून,घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ते म्हणाले की, मशिदीचे शिष्टमंडळ, बीएमसी अधिकारी आणि धारावी पोलिसांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी चर्चा केली. बीएमसी म्हणते, 'धारावीतील 90 फूट रोडवर अतिक्रमण करून बांधलेल्या मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी बीएमसीने संबंधित पक्षाला नोटीस बजावली होती. मशिदीच्या विश्वस्तांनी बीएमसी परिमंडळ 2 चे उपायुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी विनंती पाठवून 4-5 दिवसांची मुदत मागितली आहे.