मुंबई पोलिसांच्या एसआयटी चौकशीत मोठा खुलासा; जाणून घ्या ड्रग्स प्रकरणात कशी झाली वसुली? ‘त्या’ सेल्फीमुळं पर्दाफाश

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (16:01 IST)
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून अनेक नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. या ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  याला अटक झाली. यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी  सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता मुंबई पोलिसांच्या एसआयटी चौकशीत एक मोठा खुलासा समोर आला आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) च्या नावावर काहीजण वसुली करायचे हे कळालं आहे.त्यामध्ये प्रमुख नाव किरण गोसावी याचं समोर आलं आहे.किरण गोसावी आणि त्याचे काही साथीदार स्वत:ला एनसीबी अधिकारी (NCB officer) असल्याचं सांगत वसुली करायचे.किरण गोसावीनं मोठ्या चालाखीने आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि त्यानंतर आर्यन खानची ऑडिओ क्लीप मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली.अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून समोर आली आहे.
 
दरम्यान, तसेच, जेव्हा आर्यन खानला एनसीबी (NCB) कार्यालयात आणलं गेले तेव्हा गोसावीला हे माहित होतं की त्याठिकाणी मीडियाही मोठ्या संख्येने आहे. त्या परिस्थितीचा फायदा घेत स्वत: आर्यन खानचा हात पकडून त्याने एनसीबी कार्यालय गाठलं. जेणेकरुन टेलिव्हिजनवर तो एनसीबी अधिकारी असल्याचं भासेल.

तसेच, लोअर परेळ भागात किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिला भेटून तिला पुरावे दाखवले.जेणेकरुन तो एनसीबी अधिकारी आहे आणि तो आर्यनला या प्रकरणातून बाहेर काढू शकेल असा विश्वास तिला वाटेल. या दरम्यान, या चौकशीच्या माध्यमातून मुंबई पोलिस (Mumbai Police) हे किरण गोसावी आणि काही लोकांवर प्रिवेंशन ऑफ करप्शनचा गुन्हा नोंद करणार आहेत.त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीचं स्टेटमेंट तिची तब्येत खराब असल्याने रेकॉर्ड केले गेले नाही. पण, या प्रकरणात अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे याचंही नाव समोर आलं आहे.मात्र, त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटलं जातंय. यामुळे आता एसआयटी पथकाचा तपास हळुवार सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती