'युवराजांची दिशा चुकली', आदित्य ठाकरेंनी बॅनरबाजीवर दिले प्रत्युत्तर, 'ती त्यांची संस्कृती'

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (11:58 IST)
विधिमंडळात 24 ऑगस्टला गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि राष्ट्रवादींच्या आमदारांमध्ये हमरी-तुमरी झाली झाली. आज ( 25 ऑगस्ट) ही परिस्थिती निवळेल का असा प्रश्न पडलेला असताना आज एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
'युवराजांची दिशा चुकली,' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आज शिंदे गटातील आमदारांनी निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'परमपूज्य युवराज' असा करत शिंदे गटाने आज विधिमंडळात बॅनरबाजी केली.
 
आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यावरुन पोस्टर बनवून शिंदे गटाने आज निदर्शनं केली.
 
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
 
"आदित्य ठाकरे यांच्याबाबत अशी बॅनरबाजी करून काहीही साध्य होणार नाही. सर्व महाराष्ट्र तुमच्याकडे पाहत आहे. कोण काय करतंय याची नोंद जनता घेत आहे," असं अंधारे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटले.
 
'तीन माळ्यांच्या मातोश्रीचा आदर'
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'जुने मातोश्री' आणि 'नवे मातोश्री' यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी टीका केली.
 
गोगावले म्हणाले, "प्रत्येकाने आपापली मर्यादा राखली पाहिजे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही लढतो. आमचं चुकलं तर आम्ही माफी पण मागतो. त्यांनी चूक दाखवावी. आम्ही काय बांगड्या घातल्या नाही. बॅनरवर तुम्ही वाचायचं आणि काय अर्थ काढायचा तो काढायचा. मातोश्री दोन आहेत. तीन माळ्यांच्या मातोश्रींचा आदर आहे. पण 8 माळ्यांच्या मातोश्रीवर आमचे पाय दुखतात."
 
'फुटलेल्या आमदारांनी आपली संस्कृती दाखवली'
शिंदे गटाच्या आमदारांनी जी निदर्शनं केली त्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
"आज फुटलेल्या आमदारांनी जी बॅनरबाजी केली, त्यातून त्यांनी आपली संस्कृती दाखवली आहे. या फुटीर आमदारांनी राजीनामे द्यावे आणि जनतेला सामोरं जावे," असं ठाकरे म्हणाले.
 
आम्ही आजही जनतेत जात आहोत. हे लोक का जनतेत जात नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती