बाजारातील भेळची चव घरी आणणे फारसे कठीण नाही. फक्त काही छोट्या टिप्स वापरल्या की तुमची भेळही अगदी 'ठेल्या'वर मिळते तशी कुरकुरीत आणि चटपटीत होईल. आज आपण झटपट आणि सोपी बाजारासारखी कुरकुरीत भेळ रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य-
मुरमुरे (भडंग)-३-४ वाट्या (कुरकुरीत केलेले)
बारीक शेव, पापडी-अर्धी वाटी
कांदा व टोमॅटो-प्रत्येकी १ मध्यम (बारीक चिरलेला)
बटाटा-१ उकडलेला (फोडी करून)
ओली चिंच-गुळाची चटणी-२-३ मोठे चमचे
तिखट हिरवी चटणी-१-२ मोठे चमचे
मसाले-चाट मसाला, लाल तिखट, मीठ
सजावटीसाठी-कोथिंबीर, लिंबू आणि खारे दाणे
कृती-
सर्वात आधी मुरमुरे कढईत थोडे गरम करून घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि मीठ घातले तर चव अधिक खुलते. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेला बटाटा घ्या. त्यात हिरवी तिखट चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी घालून व्यवस्थित मिक्स करा. आता या मिश्रणात कुरकुरीत मुरमुरे, खारे दाणे आणि पापडी चुरडून टाका. वरून चाट मसाला आणि थोडे लाल तिखट भुरभुरा.सगळ्यात शेवटी भरपूर कोथिंबीर आणि बारीक शेव घाला. खाण्यापूर्वी अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि झटपट मिक्स करून लगेच सर्व्ह करा.