आमची आधुनिक सखू!

शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (17:23 IST)
मला माझा उपवास, देव, भजन व्यर्थ वाटलं. माणसातला देव खरंतर वैशूनंच जाणला होता. रात्री सगळं आवरून नेहमीप्रमाणे मी आईला फोन लावला. ती देवळातून कीर्तन ऐकून आली होती. तिथं ऐकलेली गोष्ट ती मला सांगू लागली...
गुलमोहर हाउसिंग सोसायटी. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या गुलमोहराच्या झाडांमुळेच सोसायटीचं हे नाव अगदी सार्थ ठरत होतं. एका बाजूला रो बंगलोज् आणि दुसऱ्या बाजूला दोन-तीन बेडरूम्सचे प्रशस्त फ्लॅट्स. साहजिकच, इथं राहणारे सगळेच सुखवस्तू.
त्यातल्याच एका बंगल्यात आम्ही. सोसायटीतल्या आम्हा पाच-सहा जणींचा छान ग्रुप जमलेला आहे. भिशी, सहली, भजनी मंडळ वगैरे काही ना काही सुरूच असतं आणि वेळ मिळेल तेव्हा गॉसिपही असतंच!
त्यातही आजकालच्या मुलांना (स्वतःची वगळून हं!) कसं काही कुणाशी देणं-घेणं नसतं... त्यांना देवाचं काही करायला नको...त्यांच्यावर काही संस्कारच नाहीत वगैरे ताशेरेही असतातच.
माझ्या अगदी समोरच्या इमारतीतला दर्शनी फ्लॅट बांधला गेल्यापासून बंदच होता. बहुधा कुणीतरी "इन्व्हेस्टमेंट' म्हणून घेऊन ठेवला असावा...पण आज सकाळी दार उघडून बाहेर आल्यावर पाहते तर काय...तो समोरचा फ्लॅट आज उघडा दिसला. रस्त्यावर सामानानं भरलेला ट्रक व एक आलिशान कार. कारमधून एक अत्याधुनिक अशी तरुणी उतरली. जिन्सची पॅंट व टी शर्ट...भुरभुरणारे मोकळे केस... गळ्याभोवती स्कार्फ...गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, म्हणजे लग्न झालेली. त्या फ्लॅटची मालकीण असावी. कारच्या बाजूच्या दारानं एक रुबाबदार तरुण बाहेर पडला. तिचा नवरा असावा. राहणीमानावरून व कारवरूनच ते जोडपं सुखवस्तू वाटत होतं.
"हे' मॉर्निंग वॉकला गेले होते. ते आल्यावरच दुसरा चहा घ्यावा म्हणून मी परत आत आले व वर्तमानपत्र उघडलं. दाराची बेल वाजली. हेच आले असणार म्हणून मी दार उघडलं; पण दारात ती तरुणी.
""काकू, मी तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेय,'' असं तिनं सांगताच मी दरवाजातून बाजूला होत "या ना, आत' म्हटलं.
त्यावर ती म्हणाली  ""नको. सामान उतरवताहेत ना, तिथं थांबायला हवं; पण माझं एक काम होतं तुमच्याकडं. तुमच्या कामवाल्या बाई आल्या की त्यांना माझ्याकडं पाठवाल का? नाही म्हणजे, त्या स्वतः करणार नसल्या तरी निदान दुसरी कुणी बाई तरी शोधायला मदत होईल. बरं, मग येऊ? अरे, या सगळ्यात माझं नाव सांगायचंच राहिलं. मी वैशाली देशमुख. मिस्टर अजय इथं एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहेत.''
मीदेखील माझी ओळख सांगितली व ती गेली. प्रथमदर्शनी मला शिष्ट, आगाऊच वाटली ती!
नंतर ती अधूनमधून दिसायची. गॅलरीत कपडे वाळत घालताना...कधी स्कूटीवरून बाजारात जाता-येताना...कधी चक्क रांगोळी काढतानाही...दिसली की हसायची मात्र गोड. एक दिवस मीच विचारलं  ""काय हो, घरातलं सामान लावून झालं का सगळं?''
त्यावर ती म्हणाली  ""लागतंय हळूहळू. मनासारखं लावून होईपर्यंत वेळ जाणारच.''
अशी दोन-चार वाक्यांची देवाण-घेवाण आमच्यात होऊ लागली. आमचं भगिनी मंडळ तिच्याविषयी चर्चा, तर्कवितर्क करू लागलं. "भलतीच मॉडर्न वाटते' वगैरे.
त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. उपवास असल्यानं सकाळी स्वयंपाकाची घाई नव्हती. मी अंगणात ऊन्ह खात बसले होते. तेवढ्यात वैशाली दिसली. गेटजवळ उभी. तिच्या नवऱ्याला बाय बाय करत असलेली. तो गेल्यावर ती आत जायला वळणार तोच मी सहजच विचारलं  ""आज काय उपवास का?''
""नाही हो; पण मोदक मात्र केलेत आज, अजयला आवडतात म्हणून. भाजी-पोळी आणि मोदक दिलेत डब्यात. देवाच्या नैवेद्याला पाच मोदक काढून ठेवलेत...,'' तिचं उत्तर.
""अगं, पण नैवेद्य चंद्रोदयानंतर रात्री दाखवायचा असतो. उपवास सोडताना,'' मी तिच्या लक्षात आणून दिलं. त्यावर वैशालीनं जे काही सांगितलं, त्यावर माझी बोलतीच बंद झाली.
ती म्हणाली  ""काकू, उपवास आपला आहे, देवाचा नाही! मग काय हरकत? बरं, मी निघते, वॉशिंग मशिन लावून आंघोळीला जाते.''
-माझ्यावर परत "बॉम्ब' पडला!
अरे देवा! म्हणजे हिनं मोदक केले तेही पारोशानंच? शिव...शिव...!
""अगं, निदान मोदक तरी आंघोळ करून करायचेस ना...'' मी म्हटलं.
""अहो काकू, मोदकांचं काम आधीच किचकट. त्यातून "ह्यां'ची घाई. शिवाय, सगळं काम आटोपल्यावर आंघोळ केली की मग दिवसभर कसं फ्रेश वाटतं,'' वैशालीचा तसा बिनतोड युक्तिवाद!
तिचं उत्तर पटतं नसलं तरी तिचं काही चुकलंय असं वाटेना मला.
*
अधूनमधून असाच काही ना काही कारणानं आमचा संवाद व्हायचा. तिचे विचार वेगळे होते; पण वाईट नव्हते हे जाणवलं; आपणच आपली जुनी पद्धत बदलायला सहजी तयार नसतो. आता इतर बायकांशी बोलताना मी तिच्याबद्दल चांगलं नाही; पण वाईटही बोलत नसे. एकदा कामवाल्या बाई रोजच्या वेळेवर न आल्यानं तिच्याकडं विचारायला गेले तर बाई तिच्याकडं काम करत होत्या व त्या बाईंची मुलगी तिथं अभ्यास करत बसलेली होती. वैशाली तिला गणित समजावून सांगत होती.
-मी विचारलं  ""काय? ट्यूशन वगैरे सुरू केलीत की काय?''
""नाही हो, आपल्या रखमाबाई म्हणाल्या, "मुलीला गणित अवघड जातं; पण ट्यूशन लावायला पैसे कुठून आणायचे? मग मीच म्हटलं, घेऊन या तिला सोबत. मी शिकवीन तिला. नाहीतरी दुपारचा वेळ असतो थोडा मोकळा. ज्ञानाचा तेवढाच उपयोग. नाही का?''
वैशूचं खूपच कौतुक वाटलं मला. एखाद्याच्या दिसण्यावरून आपण किती पटकन मत बनवून मोकळे होतो, याची खंत वाटली.
त्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव म्हणून आमचं भजन होतं व नंतर उत्सवाची सांगता. आमच्या मंडळाला बक्षीसही मिळणार होतं. सभामंडपासमोर रांगोळी काढायची होती. मी सहज वैशूला विचारलं तर ती लगेच म्हणाली  ""त्यात काय, येईन मी रांगोळी काढायला.''
आम्ही सगळ्याच जरीकाठाच्या साड्या वगैरे नेसून तयार झालो व निघालो. वैशूला हाक मारली तर ती आली पॅंट-टी शर्टमध्ये. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली..."बघा, इतकंही समजत नाही का? देवळात जायचं तर निदान साडी नेसावी...पण या आजकालच्या मुलींना ना, ताळतंत्रच नाही काही...' वगैरे.
आम्ही देवळात पोचलो. रांगोळी काढायला बसावं तर साडी खराब होणार...पण शेवटी वैशू मस्त फतकल मारून बसली. सुरेख रांगोळी काढली तिनं. फुलांनी सजवलीही. बाकीच्या नुसत्याच इकडून तिकडं मिरवत होत्या.
रांगोळी झाल्यावर वैशू म्हणाली  ""काकू, आता मी घरी जाऊन तयार होऊन येतेच.''
""अगं पण... नक्की ये हं. अर्धा तासच राहिलाय आता कार्यक्रम सुरू व्हायला,'' मी म्हटलं.
""हो, येतेच पटकन'' असं म्हणत ती गेलीही.
मनात आलं... हीसुद्धा आपल्यासारखीच तयार होऊन आली असती तर रांगोळी कशी काढली गेली असती? अन् मघाशी तिनं साडी न नेसल्याबद्दल वाटलेला विषाद कौतुकात बदलला.
कार्यक्रम सुरू झाला. मी व्यासपीठावर असल्यानं माझी नजर तिला श्रोत्यांमध्ये शोधत होती; पण ती काही दिसली नाही. कार्यक्रम संपला. बाकीच्या म्हणाल्या, "अगं तिला यायचंच नसणार. उगाच "येते' म्हणून आपलं समाधान केलं.' असो. आम्ही घराकडं निघालो. घराजवळ पोचताच समोरून वैशाली स्कूटीवरून येताना दिसली. छान हिरवी, काठा-पदराची साडी...गळ्यात लांब मंगळसूत्र... हातात हिरव्या बांगड्या. अगदी लक्ष्मीच जणू. पण हे कोण तिच्या मागं बसलंय? समोरच्या नेन्यांचा बंटी? त्याच्या डोक्याला व हाताला बॅंडेज बांधलेलं. मला बघून वैशू थांबलीच.
""अगं, तू देवळात येणार होतीस ना?'' न राहवून मी विचारलं.
""अहो काकू, मी आवरून बाहेर पडलेच होते. तेवढ्यात बंटी उंचावरून जोरात पडल्याचा आवाज आला. बघते तर काय, खूपच लागलं होतं त्याला. त्याचे आई-बाबाही अजून ऑफिसमधून आलेले नव्हते. मग काय? बसवलं त्याला गाडीवर अन् नेलं डॉक्टरांकडं. डोक्याला चार-पाच टाके पडलेत. आता घरीच नेते त्याला. गरम दूध वगैरे प्यायला देते. तोवर त्याचे आई-बाबा येतीलच. मग सोडेन त्याला घरी. "काळजी करू नका', म्हणून फोनही केलाय मी त्याच्या आई-बाबांना. कार्यक्रम काय, पुढच्या वर्षी होईलच हो; पण बंटीला दवाखान्यात वेळेवर नेणं जास्त गरजेच होतं. होय ना?'' तिच्या प्रश्नावर मी निरुत्तर.
मला माझा उपवास, देव, भजन व्यर्थ वाटलं. माणसातला देव खरंतर वैशूनंच जाणला होता.
रात्री सगळं आवरून नेहमीप्रमाणे मी आईला फोन लावला. ती देवळातून कीर्तन ऐकून आली होती. तिथं ऐकलेली गोष्ट ती मला सांगू लागली...
""ऐकतेस ना?'' आईनं विचारलं.
मी म्हटलं  ""बोल.''
ती सांगू लागली  ""अगं, "देव भावाचा भुकेला' असं आज बुवांनी सांगितलं. एक ना सखू नावाची बाई असते. ती सकाळी उठल्या उठल्या गरमगरम शिरा किंवा खीर किंवा घरात जी सामग्री असेल तिचा वाटीभर नैवेद्य करते व देवाला ठेवते, "देवाची न्याहारी' म्हणून. मग तिचं सगळं काम आवरायला, जेवायला तिला दुपारच उलटून जाते. शेजारपाजारच्या बायका तिला नावं ठेवतात. "असं करू नकोस. आंघोळ वगैरे करून घेऊन व स्वतःचं सगळं आटोपल्यावर देवाला नैवेद्य दाखवत जा,' असं तिला सांगतात. मग ती तसं करायला सुरवात करते. तीन-चार दिवस जातात. शेवटी, देव तिच्यासमोर प्रकट होतो आणि म्हणतो ः "अगं, किती उशीर होतो माझ्या जेवणाला? भूक लागून जाते...तू पूर्वी द्यायचीस तशी सकाळीच "न्याहारी' देत जा. मला चालते.'
सांगण्याचं तात्पर्य काय, "देव भावाचा भुकेला' असतो.
आईची गोष्ट संपली. त्या गोष्टीतला शब्दशः अर्थ नको घ्यायला; पण एवढ कळलं, की मनापासून केलं की ते देवापर्यंत पोचतं...मग ते कुठल्याही वेळी करा.
अन् माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मला आठवली वैशू. आधुनिक काळातली सखू! देवाला समजून घेणारी अन् माणसातला देव जाणणारी!

 (सुनेत्रा जोशी)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती