सणासुदीच्या काळात ऑनलाईन वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्याल?

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (23:28 IST)
सणासुदीच्या काळात घरात एखादी नवी वस्तू घ्यायचा विचार बहुतेकांच्या मनात असतो. मग यात फोन, टीव्ही, कार यापैकी काहीही वस्तू असू शकते.
 
सणासुदीच्या काळात अनेक ग्राहकोपयोगी वस्तू आणि मोबाईल फोन सवलतीच्या दरात ऑनलाइन स्टोअर्स किंवा दुकानांमध्ये उपलब्ध असतात.
 
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्राहक देखील खरेदी करतात कारण त्यांना दिवाळीच्या काळात बोनस वगैरे मिळतो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि अशा वस्तूंची विक्रीही जोर धरू लागली आहे.
 
या सणासुदीच्या काळात भारतातील एकूण विक्री मूल्य 90 हजार कोटी रुपये असण्याची शक्यता सल्लागार कंपनी रेडसीरने आपल्या अहवालात नमूद केली आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात ऑनलाइन कंपन्यांचे एकूण विक्री मूल्य 47,000 कोटी रुपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
ब्रँडेड कंपनीचे उत्पादन जास्त किंमतीत खरेदी करण्याऐवजी तेच उत्पादन कमी किंमतीत खरेदी करता येईल का? ऑनलाइन खरेदी करणं फायद्याचं की दुकानात जाऊन प्रत्यक्ष खरेदी करणं फायद्याचं याबद्दल अनेकांना शंका आहेत. अशावेळी गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
 
वस्तू ऑनलाइन खरेदी करताना काय पाहाल?
अगदी सहज, वेळेची बचत, त्रासमुक्त, बसल्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी खरेदी करू शकता. पण तेच दुकानात व्यक्तीशः जाणे आणि एखादी वस्तू बघून मग ती खरेदी करणे त्रासदायक असतं.
 
आर्थिक-बचत सल्लागार आणि वन क्र्युचे सीपीओ सतीश कुमार म्हणतात की, अनेक लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात कारण ऑनलाइनमध्ये ही समस्या येत नाही.
 
ते पुढे सांगतात की, "ऑनलाइन उत्पादने खरेदी करताना तुम्ही शक्य तितक्या म्हणजेच दोन किंवा तीन ऑनलाइन वेबसाइट्सला भेट द्या आणि किमतींची तुलना करा. शक्य असल्यास तुम्ही दुकानात जाऊन किंमतीही तपासू शकता. कधीकधी ऑनलाइन कंपन्यांपेक्षा जास्त सवलत दुकानात मिळते."
 
जर तुम्ही दुकानातून वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भाव कमी जास्त करता येतो. घरातील जुन्या वस्तू देऊन नवीन वस्तू खरेदी करता येते. अशा पद्धतीने पैसे देखील कमी होत असल्याचं सतीश कुमार सांगतात.
 
एखादे उत्पादन ऑनलाइन स्वस्त आहे म्हणून खरेदी करू नका, तर ग्राहकांनी दिलेले रेटिंग आणि रिव्ह्यू विचारात घ्या, असा सल्लाही ते देतात.
 
स्वस्त विरुद्ध महाग - नेमकं काय खरेदी करावं?
काही लोक महाग उत्पादन घेण्याऐवजी स्वस्त उत्पादन घेण्यास प्राधान्य देतात.
 
याविषयी बोलताना सतीश कुमार सांगतात, "कमी खर्चात अधिक सुविधा मिळाव्या म्हणून अनेक लोक स्वस्त उत्पादने खरेदी करतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ब्रँडेड 40 इंची टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. पण हेच कधीच नाव न ऐकलेल्या नव्या कंपनीचा तोच टीव्ही 12,000 किंवा 13,000 रुपयांना मिळतो. मग अशावेळी लोक हा स्वस्त टिव्ही खरेदी करतात."
 
ब्रँडेड उत्पादने अधिक महाग असली तरी ती टिकणारी असतात त्यामुळे अशा वस्तू घेणच चांगलं असल्याचं ते सांगतात.
ते पुढे सांगतात, "एखाद्या कंपनीच्या स्वस्त उत्पादनांची कार्यक्षमता कालांतराने कमी होत जाते. त्यांची अनेकदा दुरुस्ती करावी लागते किंवा मग त्याऐवजी लगेच नवीन वस्तू घ्यावी लागते. त्यामुळे एकदाच खर्च करून दर्जेदार उत्पादन खरेदी करणं कधीही चांगलं."
 
सतीश सांगतात की, "लोकांना दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यात जास्त रस असतो. अनेक लोकांना त्या वस्तूंना हात लावून पाहायचं असतं. तुम्ही ऑनलाईन बाईक खरेदी करू शकता, पण तरीही लोक दुकानात जाऊनच बाईक घेतात, त्यामागे हे कारण आहे."
 
"तुम्ही एका जागी बसून ऑनलाइन उत्पादने खरेदी करू शकता, पण या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 4-5 दिवस लागतात. पण जेव्हा तुम्ही दुकानात जाऊन खरेदी करता तेव्हा ती वस्तू तुम्हाला त्याच दिवशी मिळते."
 
त्याचप्रमाणे, अशा वस्तूंमध्ये काही समस्या आल्यावर ऑनलाइन कंपनी किंवा विशिष्ट उत्पादनाच्या निर्मात्याशी संपर्क साधणं कठीण जातं. पण तेच दुकानातून आलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाला तर आपण थेट दुकानात जाऊ शकतो."
 
"स्टार मॅटर्स"
आपण फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादींवर 2 स्टार, 5 स्टारचे स्टिकर चिकटवलेले पाहिले आहेत.
 
गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यापूर्वी याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे असं अन्नामलाई विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागाचे प्राध्यापक डॉ. जी. शक्तीवेल म्हणतात.
"हे स्टार्स एकप्रकारचे रेटिंग असतात जे भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) द्वारे दिले जातात. 2 स्टार असलेलं उत्पादन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमी खर्च येईल. पण तेच तुम्ही 5 स्टार रेटिंग असलेलं उत्पादन खरेदी केल्यास त्याचे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. पण जेव्हा तुम्ही जास्त स्टार रेटिंग असलेली उत्पादने खरेदी करता तेव्हा ती उत्पादने कमी वीज वापरतात. विजेचा वापर कमी केल्यामुळे लाईट बिल कमी येते आणि या वस्तू खूप चांगल्या टिकतात."
 
भविष्यात ई-कचरा ही मोठी समस्या असेल. त्यामुळे पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू खरेदी करणे केवळ व्यक्तीसाठीच नाही तर समाजासाठी देखील फायदेशीर असल्याचं शक्तीवेल म्हणतात.
 
उत्पादनाचा आकार महत्वाचा
गृहोपयोगी वस्तूंबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे त्यांचा आकार. याबाबत बोलताना शक्तीवेल सांगतात, "काही लोक त्यांच्या घराच्या हॉलमध्ये मोठा टीव्ही लावतात. जर खोली लहान असेल तर एक छोटा टीव्ही पुरेसा असतो, मोठा टीव्ही विकत घेऊन जागा आणि पैसे दोन्ही वाया गेल्यासारखं आहे."
बऱ्याच ठिकाणी विनाकारण मोठे फ्रीज वगैरे विकत घेतले जातात. यामुळे जागा अडवली जाते. त्यामुळे घराच्या आकारानुसार वस्तूंचा आकार ठरवावा असं ते म्हणतात.
 
तुमच्या गरजेनुसार उत्पादन खरेदी करा
शक्तीवेल सांगतात, "काहीजण अद्ययावत उत्पादने खरेदी करतात. यावर प्रचंड पैसे घालवतात पण त्या वस्तू वापरल्या जात नाहीत. त्यामुळे अशी उत्पादने घेण्याऐवजी आपण आपल्या गरजेनुसार उत्पादने खरेदी करून पैसे वाचवू शकतो."
 







Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती